आशियाई तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी
बँकॉक : वृत्तसंस्था
अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या खात्यावर सातवे पदक जमा झाले.
अभिषेक-ज्योती जोडीने कंपाऊंड मिश्र दुहेरी प्रकारातील अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या यि-सुआन चेन आणि चेह-लूह चेन जोडीचा 158-151 असा पराभव केला. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली.
दिवसाच्या पूर्वार्धात अभिषेकने फक्त एका गुणाच्या फरकाने कंपाऊंड सांघिक सुवर्णपदक गमावले. कोरियाने 233-232 असा पराभव केल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिषेक, रजत चौहान आणि मोहन भारद्वाज या त्रिकुटाने पहिल्या सत्रात अप्रतिम खेळ करीत बरोबरी साधली, परंतु दुसर्या सत्रात जाईवॉन यांग, याँगची चॉय आणि ईऊन-क्यू चोय यांनी सामन्यावरील नियंत्रण सोडले नाही. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती, मुस्कान किरार आणि प्रिया गुर्जर यांनी कोरियाकडून 215-231 अशी हार पत्करल्याने जेतेपद गमावले.
जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घातल्यामुळे भारतीय खेळाडू त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाले होते.