पनवेल ः रामप्रहर वृत्त
लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केट, यशकल्प फाऊंडेशन, संगीता नितीन सामजिक विकास संस्था, यशकल्प क्लासेस यांच्या माध्यमातून भाषण व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाची सुरुवात समतेचा संदेश देणार्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी निसर्ग संवर्धनचा संदेश मुलांना देण्यात आला होता. भाषणासाठी पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी व सातवी ते दहावी असे तीन गट करण्यात आले होते. प्रत्येक गटासाठी वेगळा विषय ठेवण्यात आला होता. पहिल्या गटासाठी भारताचे स्वातंत्र्य, दुसर्या गटासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सहन कराव्या लागलेल्या हाल-अपेष्टा आणि मोठ्या गटासाठी स्वातंत्र्योत्तर भारत असे विषय देण्यात आले होते. तिन्ही गटामधून प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आले व त्यांना कार्यक्रम संपल्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली या कार्यक्रमाला लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केटच्या जिल्हाध्यक्ष सिंधू रामचंद्रन, अध्यक्षा संगीता जोशी, विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या कुसुम मधाळे, लायनेस क्लबच्या अध्यक्षा राजी सैनी, यशकल्प फाऊंडेशनच्या अध्यक्षा यशश्री बिडये, लायन हरनीस कवर, स्नेहकुंज आधारगृहाचे संचालक नितीन जोशी, लायन योगिनी वैदू आदी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन व नियोजन यशकल्प फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त लायन यशवंत बिड्ये यांनी केले.