पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सोमवारी (दि. 21) शिवजयंतीचे (तिथीनुसार) औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख हे प्रमुख वक्ते लाभले होते. त्यांनी शिवचरित्राचे मर्म व इतिहासाची वर्तमान काळाशी सांगड घालत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर व्याख्यान दिले. या व्याख्यानात 78 विद्यार्थ्यांनी आणि 16 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला होता. अभिषेक पाटील या विद्यार्थ्याच्या शिवपोवाड्याने कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, आयक्युएससी समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. एस. एन. परकाळे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. रत्नप्रभा म्हात्रे, रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर प्रा. भावेश भोईर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.