उरण : प्रतिनिधी
दररोज पाच तास पाणीपुरवठा करण्याचे सिडकोने दिलेले आश्वासन फोल ठरल्याने आणि 15 दिवसांत फक्त अर्धा तासच पाणी मिळत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय न्हावा ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 21) सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्यांना घेराव घातला.
न्हावा ग्रामपंचायतींची न्हावाखाडी आणि तीन पाडे मिळून जवळपास साडेचार हजार लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या मानाने दररोज नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीची दररोज दीड लाख लिटर पाण्याची मागणी आहे, मात्र मागील काही महिन्यांपासून मागणीच्या निम्म्याहूनही कमी पाणीपुरवठा होत आहे. अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.
पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना तलाव, विहीर आणि उपलब्ध इतर स्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यानंतरही पुरेशा प्रमाणात नागरिकांना पाणी मिळत नाही. पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी मंत्रालयात पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेश बालदी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती.
त्या वेळी अधिकार्यांकडून न्हावा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांना दररोज पाच तास पाणी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यानंतरही पाणीपुरवठ्याची समस्या कायम राहिल्याने आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली सिडको भवनात पाणी प्रश्नावर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर गव्हाण शिवाजीनगर येथील जलवाहिनीमधून आठ इंच व्यासाची नवीन जोडणी टाकण्यात आली आहे, मात्र त्यानंतरही पाण्याची समस्या सुटलेली नाही.
न्हावा गाव उंचावर असल्यामुळे पाणी पंपाने साठवणूक टाकीत सोडावे लागते. त्यानंतरच ग्रामस्थांना पाणी वितरण केले जाते, मात्र मुळातच पाणीच मिळत नसल्याने पाणी साठवून टाकीत सोडणार कुठून आणि ग्रामस्थांना पाणीपुरवठा कसा करणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सिडकोकडून पाणीपुरवठाच सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांना 15 दिवसांत फक्त अर्धा तासच पाणीपुरवठा होत असल्याची माहिती सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे यांनी दिली.
पाणीटंचाईचे संकट दूर करण्याच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या न्हावा ग्रामस्थांनी सोमवारी सिडको भवनावर धडक दिली. इतक्यावरच न थांबता महिलांसह संबंधित विभागाच्या अधिकार्यांना घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
या सर्वपक्षीय आंदोलनात सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच मंजुषा ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, जागृती ठाकूर, माजी उपसरपंच किसन पाटील, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष शैलेश पाटील, महिला मंडळ अध्यक्ष मिनाक्षी पाटील, शांता म्हात्रे आणि सुमारे 250 ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. या वेळीही अधिकार्यांनी पुन्हा एकदा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
Check Also
नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्तशिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी …