कोरोना संकट लांबल्यामुळे त्याचा परिणाम आर्थिक अडचणीसोबत आता मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. तो टाळण्यासाठी संभ्रम वाढविणार्या गोष्टींपासून दूर राहणे, दैनंदिन जीवनात दुराग्रह टाळणे, आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून नव्या आयुष्याला सामोरे जाणे अशा काही अंगाने आता नवा विचार करण्याची गरज आहे.
कोरोना साथीत आणि साथीनंतर माणसाच्या अर्थकारणावर आणि शारीरिक स्थितीवर कोणते परिणाम होणार आहेत हे अजूनही खात्रीने कोणी सांगू शकत नाहीत. तो कसा होतो आणि कशाने बरा होतो याविषयी अजूनही संभ्रम संपलेला नाही. अर्थात कोरोना झालेल्या रुग्णावर उपचाराचे काही ठोकताळे डॉक्टरांनी अनुभवांती निश्चित केले असून त्यानुसार उपचार केले जात असल्याने अनेक रुग्ण बरे होताना दिसत आहेत, पण प्रत्येक व्यक्तीचे शरीर प्रत्येक आजाराच्या हल्ल्याला वेगवेगळा प्रतिसाद देत असते हे अनेक आजारांच्या बाबतीत जसे खरे आहे, तसेच ते कोरोनाच्या बाबतीतही खरे आहे. नाहीतर घराबाहेरही न पडलेल्या व्यक्तीला कोरोना होण्याचे काही कारण नाही. एकाच घरातील एकाला कोरोना झाला की तो सर्वांना होतो असेही काही खात्रीने म्हणता येत नाही. एवढेच काय पण गेले वर्षभर जग कोरोनाचा हल्ला सोसत असताना त्याची लक्षणेही सर्वांमध्ये सारखी आहेत असे काही सांगता येत नाही. लक्षणे सारखी नसतील तर त्यावरील औषधाला सर्व व्यक्ती सारखाच प्रतिसाद कसा देऊ शकतील, या प्रश्नाला अजून तरी काही उत्तर नाही. याचा अर्थ या नव्या साथीने माणसाला असे कोंडीत पकडले आहे की त्याची मोठीच पंचाईत झाली आहे.
कोरोनाशी मानवाचा हा लढा किती काळ आणि कसा चालेल हे आज कोणालाच माहीत नसले तरी माणसाने अशा संकटांमध्ये सहजासहजी हार मानलेली नाही. त्यामुळे या संकटावर माणूस मात करेल असा विश्वास आपण बाळगला पाहिजे. या लढाईत जगातील 750 कोटी नागरिकांपैकी अनेकांना लवकर एक्झिट घ्यावी लागत आहे हे खरे असले तरी त्याचाही स्वीकार आता करावा लागणार आहे. (एप्रिल अखेर म्हणजे गेले एक वर्ष चार महिन्यांत 31 लाख नागरिक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.) विशेषतः गेली काही दशके जग जे टोकाचे स्थैर्य आणि भौतिक, आर्थिक प्रगती अनुभवत आहे, त्या पार्श्वभूमीवर या संकटाकडे पाहिले तर त्याची तीव्रता तेवढी नाही हे आकड्याने लक्षात येते, पण या संकटात एक गडबड मात्र झाली आहे आणि ती फार मोठी गडबड आहे. ती म्हणजे भौतिक, आर्थिक श्रीमंतीमुळे माणूस आपल्या जीवन प्रवासाविषयी जे सर्व गृहीत धरून चालला होता त्याला मोठाच फटका बसला आहे. अलीकडील काही काळ त्याच्या जीवनातील चढउतार कमी झाल्यामुळे तो मानवी जीवनाची, सुख आणि आनंद एवढीच बाजू पाहू लागला होता. जीवनातील दु:ख, अनिश्चितता या नाण्याच्या दुसर्या अपरिहार्य बाजूकडे त्याने कानाडोळा केला होता. ती बाजू तेवढीच महत्त्वाची आहे आणि ती जीवनात कधी ना कधी येतेच याची आठवण कोरोना संकटाने करून दिली आहे.
मानवी जीवनातील दु:ख आणि अनिश्चिततेचा स्वीकारच कमी झाल्यामुळे बहुतांश नागरिकांच्या मनाची स्थिती आज नाजूक झाली आहे. त्यातून मानवी मनात घबराटीची जणू लाटच तयार झाली आहे. गेले वर्षभर त्याने जो धीर धरला होता, तोही आता काही जण सोडताना दिसत आहेत. ज्या समाजाला आपण नेहमी गृहीत धरतो, ते समाजजीवन कमी झाल्यामुळे अनेकांना एकटेपणा वाटू लागला आहे. सार्वजनिक सेवांचे महत्त्व अशा काळात खूपच वाढते, पण त्यांचे व्यवस्थापन या घबराटीमुळे बिघडू लागले आहे. आधीच असलेल्या संभ्रमात अशा अस्वस्थ मनांमुळे भर पडू लागली आहे. आरोप-प्रत्यारोपांमध्ये समाधान शोधण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यातून होणारे अपेक्षाभंग नव्या मानसिक अस्वस्थतेला जन्म देताना दिसत आहेत. त्यामुळे नजीकच्या भवितव्यात आर्थिक आणि शारीरिक हानीपेक्षाही कोरोना मानसिक हानी अधिक करणार अशी लक्षणे दिसू लागली आहेत.
सध्याच्या या परिस्थितीतून जे समोर येत आहे ते असे आहे. अशा संकटाचा मुकाबला करण्यासाठीचे स्थिर आणि शांत मन घडविण्यात आधुनिक माणूस कोठेतरी कमी पडला आहे. या संकटाला एक वर्ष होऊन गेल्यानंतर मानवाकडून अधिक परिपक्व प्रतिसादाची गरज होती, पण गृहीत धरण्याच्या मानसिकतेमुळे त्याचे मन आता कमकुवत झाले आहे. एकदा मन कमकुवत झाले की काय होऊ शकते याची कल्पनाही करता येत नाही इतकी माणूस स्वत:ची हानी करून घेतो. एकप्रकारे तो स्वत:च स्वत:चा शत्रू होतो. सोशल मीडियावरील बेशिस्त संदेशांचे अर्थ काढून त्यानुसार जगण्याचे वेडेवाकडे प्रयत्न तो करू लागतो. आपल्या आजूबाजूच्या सुहृदयींचे जीवन अनुभव त्याला अधिक विश्वासार्ह वाटले पाहिजेत, पण एकटेपणामुळे तो त्याचे मूल्य हरवून बसला आहे.
कोरोना काळाने काही गोष्टी तर अगदी स्पष्ट केल्या आहेत. त्या म्हणजे समृद्ध आणि समाधानी जीवन जगण्यासाठी मन आणि शरीराच्या व्यायामाला जेवढे महत्त्व आहे तेवढे कशालाच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जीवन जगण्यासाठी फार कमी गोष्टी लागतात, पण त्यासाठी केवढा पसारा आपण वाढवून ठेवला आहे याची जाणीव या काळाने करून दिली आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि यश त्याने इतक्या टोकाला नेऊन ठेवले आहे की त्यातून आपण कुटुंब आणि समाजाला नाकारले आणि त्याचे परिणाम आपण आता भोगत आहोत हे त्याला स्वीकारावे लागणार आहे. नव्हे त्यात दुरुस्ती केली तरच त्याच्या मनाचे आरोग्य तो राखू शकणार आहे. आपल्याला कोणाची गरज नाही अशी भावना वाढीस लागण्यास वेगाने झालेली भौतिक प्रगती कारणीभूत असून तिच्याही मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.
आपल्या आजूबाजूला आज जे घडत आहे तसे आपल्या आयुष्यात पूर्वी कधीच घडले नाही हे नाकारता येत नाही, पण मानवी जीवनातील प्रत्येक दिवस, खरे म्हणजे प्रत्येक क्षण नवा असतो हेही आपण नाकारू शकत नाही. अशा प्रत्येक क्षणाकडून आणि येणार्या दिवसाकडून माणूस एकतर्फी सुख आणि आनंदाची अपेक्षा करू लागला आणि त्यातून जो अपेक्षाभंग वाट्याला आला आहे त्यामुळे मन कमकुवत होत असेल, तर माणसाला त्याची मनशक्ती वाढवावी लागेल. निसर्ग आणि जग त्याच्या त्याच्या चालीने पुढे जात राहणार आहे. अशा या जगात मिळालेला मानवी जन्म जेवढा दुर्मीळ मानला जातो, तेवढाच तो अमर्याद अवकाश आणि काळाची तुलना करता क्षणभंगूर आहे एवढे एकदा समजून घेतले की अशा संकटांच्या काळातील घबराटीऐवजी मनाच्या मशागतीकडे आपण लक्ष देण्यास प्रवृत्त होतो आणि त्याचीच आज सर्वाधिक गरज आहे.
मनाच्या मशागतीसाठी काय करता येईल?
- फार पुढचा विचार न करता या काळात तरी वर्तमानात तसेच नजीकच्या भविष्यात राहण्याचा प्रयत्न करणे.
- आपण कोणाला उपयोगी पडू शकतो का, याचा सतत विचार करणे.
- काय हवे आणि काय नको याविषयीचे दैनंदिन जीवनातील दुराग्रह कमी करणे.
- आपले नातेवाईक आणि मित्रांशी सतत संवाद साधणे आणि त्यात नकारात्मक विचार टाळून चांगल्या आठवणींना उजाळा देणे.
- मनातील संभ्रम वाढविणार्या घटना, घडामोडींकडे दुर्लक्ष करणे. विशेषतः सोशल मीडियातील संदेश, बातम्यांच्या पार्श्वभूमीवर गंभीर संगीत लावणारी टीव्ही चॅनेल न पाहणे आणि भडक बातम्या न वाचणे.
- मानसिक त्रास होत असेल, तर या काळात राजकीय विचारविनिमयापासून दूर राहणे.
- घरातील छोट्या छोट्या कामात पुढाकार घेऊन त्यात आनंद घेणे.
- हलक्या शारीरिक व्यायामासोबत दिवसातून एकदा ध्यानधारणा करणे.
- मनातील स्पर्धेचे विषय कमी करून सहजीवन पद्धतीचा अधिक विचार करणे.
- कोरोना साथीमुळे समाजजीवन आणि वैयक्तिक जीवनात झालेली उलथापालथ प्रयत्नपूर्वक स्वीकारून सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न करणे.
-यमाजी मालकर
ymalkar@gmail.com
RamPrahar – The Panvel Daily Paper