अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील किहीम गावातील वैभव तांबट या प्रतिभावान मुलाने पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. त्याकरीता तैवान येथील युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची निवडदेखील झाली. सक्षम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रोत्साहनपर मदत म्हणून वैभव तांबट यांना राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. वैभव तांबट यांनी अवघ्या दिड वर्षांचा असताना वडील गमावले व 14 वर्षाचा असताना आईला गमावले. पुढे किहीम येथे मामा मिलींद समेळ यांच्याकडे राहून त्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 12वीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर पनवेल येथे सीकेटी कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून जळगाव येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले. आर्थिक अडचणींसोबतच तैवान येथे पीएचडी करत असताना स्टायपेंड मिळेल परंतु प्रवास खर्च आहे, कोरोनाबाबत नियमावलीचे पालन करताना राहण्याची व अन्य व्यवस्था खर्चिक असल्याने आर्थिक ताळमेळ बसणे कठीण असल्याचे वैभवने सक्षम एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यांची भेट घेत अडचण मांडली. सक्षमचे मार्गदर्शक प्रशांत मोरजकर यांच्या आर्थिक मदतीतून कै. डॉ. अर्जुन मोरजकर शिष्यवृत्ती योजने अंतर्गत या गुणी विद्यार्थ्याला 50 हजार रुपयांची मदत करण्यात आली. सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे शार्दूल काठे, प्रतिम सुतार, योगेश पवार, गणेश भोईर, विशाल आमले, छाया म्हात्रे, प्रतीक म्हात्रे, अनिकेत नाईक, मिलींद समेळ आदी सदस्य या वेळी उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्या विद्यार्थ्याला सहकार्य करता आल्याची भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली. सक्षम एज्युकेशन सोसायटीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक पाठबळ उभ्या करणार्या प्रत्येक दात्याचे या वेळी आभार मानण्यात आले. सदर कार्याची दखल घेत समाजातील अनेकांनी वैभव तांबट यांना शैक्षणिक कार्यासाठी मदतीचा ओघ सुरू केला आहे.