पालिका प्रशासनाचे वेधले लक्ष
कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी
कर्जत शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंग यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्जत विकास समितीने रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. कर्जतकरांनी या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला असून 700हून अधिक सह्या नागरिकांनी रविवारची सुट्टी असतानाही उपस्थिती लावून मोहीम यशस्वी केली.
कर्जत शहरात रस्ते रुंद झाले असून सर्व रस्त्यांवर वाहनांची अवैध पार्किंग होम असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच मुख्य रस्त्यावरच टपर्या आणि हातगाड्यांमुळे पादचार्यांनाही चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बाजारपेठेतील स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता, कर्जत पोस्ट ऑफिसजवळील चौकातील रस्ता, महावीर पेठ, रेल्वेस्टेशन चौक, सरकारी दवाखाना चौकातील रस्ता ही वाहतूक कोंडीची केंद्रे बनली आहेत. त्यामुळे कर्जत विकास संघर्ष समितीने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यासाठी सह्यांची मोहीम राबविली. या मोहिमेला ज्येष्ठ नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
शहरातील दोन ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली असून रविवारी (दि. 27) सुट्टीचा दिवस असूनदेखील 700 हून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत फलकावर स्वाक्षरी केली. बहुजन विद्यार्थी संघटनेने लेखी पत्र देऊन आपला पाठिंबा वाहतूक कोंडी प्रश्नी कर्जत विकास समितीला दिला आहे. सह्यांची मोहीम यशस्वी करण्यासाठी कर्जत विकास संघर्ष समितीचे अॅड. कैलास मोरे, राजाभाऊ कोठारी, कृष्णा जाधव, विनोद पांडे, जयवंत म्हसे, प्रभाकर गंगावणे,शिवसेवक गुप्ता, अजय वर्धावे, मन्सुर बोहरी, मुकेश पाटील, अरविंद मोरे, मल्हारी माने, प्रशांत उगले, धनंजय दुर्गे, अमिर मनियार, निलेश हरिश्चंद्रे, सुमेश शेट्ट्ये, किशोर तावरे यांच्या पुढाकाराने स्वाक्षरी मोहीम यशस्वी झाली.