चाचण्यांवर भर; आतापर्यंत 13 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील कोरोनाबाधितांची संख्या एक अंकी झाली आहे. निर्बंध शिथिल करून दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. असे असले तरी पुन्हा चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने पालिका प्रशासनाकडून दैनंदिन चाचण्या व लसीकरणावर भर देण्यात येत आहे.
आतापर्यंत शहरात 12 लाख 66 हजार 406 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर एकूण 13 लख 35 हजार 63 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये 12 ते 14 वयोगटातील एक हजार 796 बालकांनी पहिला डोस घेतला आहे.
पनवेलमध्ये पहिल्या व दुसर्या लाटेत मोठ्या संख्येने रुग्ण आढळले. मात्र त्यानंतर पालिका प्रशासनाने निदान, लवकर उपचार व लसीकरण ही कार्यप्रणाली स्वीकारली. रुग्णसंख्या कमी झाली तरी चाचण्या व लसीकरणावर भर कायम ठेवण्यात आला. यासाठी शहरातील चाचणी केंद्रांसह लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचेही लसीकरण युद्धपातळीवर करण्यात येत आहे.
रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर शहरात संपूर्ण निर्बंध हटवण्यात आले असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले आहेत. शहरात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या एक अंकी आहे आणि यात गेले काही दिवस सातत्य आहे. असे असले तरी पालिका प्रशासन सतर्क आहे. यासाठी महापौर कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य विभाग सातत्याने मेहनत घेत आहे.
चौथ्या लाटेच्या शक्यतेने प्रशासन सतर्क
चौथ्या लाटेच्या शक्यतेने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पनवेल शहरात सोमवारपर्यंत (दि. 28) केवळ एका कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. आतापर्यंत 92 हजार 527 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. पनवेल महापालिकेने लसीकरणावर भर दिला असून आत्तापर्यंत एकूण 13 लाख 35 हजार 63 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये एक हजार 796 जणांनी पहिला डोस घेतला आहे.