नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री ठाकरेंनी माहिती दिली. या वेळी एका प्रश्नावरून ते संतापल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का, असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही, पण याचा अर्थ नाते तुटले असा नाही. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचे नाही. मी काही नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींसमोर राज्यातील विविध विषय मांडले असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षण, इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, शेतकरी पीक विमा, चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठा भाषेला अभिजात दर्जा आणि वादळग्रस्तांना मदतीचे निकष याबद्दल चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आमचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. आम्ही समाधानी आहोत, असेही ठाकरेंनी नमूद केले.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …