Breaking News

उभा सरसगड वणव्यात होरपळला

सजीवसृष्टी व वनसंपदा झाली बेचिराख

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक सरसगडावर सोमवारी (दि. 28) रात्री पुन्हा मोठा वणवा लागला. त्यात वनसंपदा व प्राणी, पक्षी बेचिराख झाले. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वत्र लागणार्‍या वणव्याने वनसंपदा उद्ध्वस्त होत आहे.

सरसगडावर सोमवारी रात्री लागलेला वणवा मोठ्या प्रमाणात भडकला होता. या वणव्यात मोठी वनसंपदा, जीवसृष्टी भस्मसात झाली. हा वणवा अधिक पसरला असता तर कदाचित मानवी वस्तीजवळ पोहोचला असता.

भारतीय वन सर्वेक्षणाच्या (एफएसआय) अहवालानुसार देशात सर्वाधिक वणवे लागणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या दहामध्ये आहे. बहुतांश वणवे मानवनिर्मित आहेत. वणवे पेटवल्यामुळे पक्ष्यांची अंडी, पिल्लेही जळून जातात. त्यामुळे त्यांची संख्याही रोडावत चालली आहे.

वणव्यामुळे जंगलातील जैवविविधतेसह औषधी वनस्पती, रानमेवा, उपयोगी वृक्षांचेही अस्तित्वही धोक्यात आले आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनीही सतर्क राहून वनखात्याला सहकार्य करणे गरजेचे आहे, तसेच प्रशासनाने पुढाकार घेऊन वणवे लावणार्‍यांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी हभप महेश पोंगडे महाराज यांनी केली आहे.

वणवा नियंत्रणासाठी वनविभागाकडे फायर ब्लोअर्स उपलब्ध आहेत. वनविभागामार्फत सतत वणवे विझविण्याचे काम केले जाते. जिथे वणवा लागला असेल त्या विभागातील वनरक्षक, वनपाल किंवा वनक्षेत्र कार्यालयात संपर्क करावा, जेणेकरून आग लगेच आटोक्यात आणता येईल. -रितेश नागोसे, वनक्षेत्रपाल, पाली, सुधागड

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply