गेली अनेक वर्षे अदनान सामी मुंबई व दिल्ली येथेच राहतात. त्यांचे वडील पाकिस्तानी असले तरी त्यांची आई काश्मिरी आहे. एकंदर अदनान सामी हे अंतर्बाह्य भारतीय आहेत. एरव्ही सर्वधर्मसमभावाची जपमाळ ओढणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अचानक भारतीयत्वाचा पुळका का आला असावा? जगविख्यात कलाकार अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारला जवळजवळ सर्वच पक्षांनी धारेवर धरले आहे. यातील विसंगती कशी मोजायची असा प्रश्न एखाद्या जाणत्या लोकशाहीवादी व्यक्तीला पडल्याशिवाय राहणार नाही. सर्वधर्मसमभाव आणि लोकशाहीचे उठता-बसता गोडवे गाणारी काँग्रेस, सोयीनुसार आपले लोकशाहीवादी रंग बदलणारी राष्ट्रवादी काँग्रेस, नव्यानेच सत्तेची चव चाखणारी शिवसेना आणि हिंदुत्वाचा नव्याने साक्षात्कार झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा अनेक पक्षांनी अदनान सामी यांना पद्म पुरस्कार बहाल केल्याबद्दल टीकेची झोड उठवली आहे. विशेष म्हणजे या सर्व पक्षांनी आजवर उजव्या विचारसरणीचा मुसलमानविरोधी पक्ष म्हणून भाजपच्या राजकारणावर वारंवार बोट ठेवले होते. मुसलमान विरोधाचा भाजपवरील शिक्का किती तकलादू स्वरुपाचा आहे हे एव्हाना भारतातील जनतेला चांगलेच कळून चुकले आहे. अदनान सामी हे एक जागतिक कीर्तीचे कलावंत आहेत. जगातील सर्वात वेगवान पियानोवादक अशी त्यांची कीर्ती आहे. उत्तम गायक, वादक, संगीतकार आणि अभिनेते असलेले अदनान सामी यांचे मूळ पाकिस्तानी आहे. त्यांचे वडील पाकिस्तानच्या हवाई दलातील अधिकारी व पाकिस्तानी सरकारचे नोकरशहा होते. तेवढाच अदनान सामी यांचा गुन्हा आहे. वडिलांच्या पाकिस्तानी कारकीर्दीबद्दल अदनान यांना पद्मश्री मिळू नये अशी काँग्रेसपासून मनसेपर्यंत अनेक पक्षांची मागणी आहे. वास्तविक अदनान सामी यांचा जन्म 15 ऑगस्ट 1973 रोजी लंडन येथे झाला. त्यांचे वकिलीपर्यंतचे शिक्षण देखील इंग्लंडमध्येच झाले. विख्यात गायिका आशा भोसले यांनी 1981च्या सुमारास अदनान सामी नावाच्या एका छोट्या पियानोवादकाला मोठ्या कौशल्याने वादन करताना पाहून संगीत क्षेत्रातच करिअर करण्याचा सल्ला दिला होता. त्यांचे संगीतकार पती दिवंगत आर. डी. बर्मन यांच्याच कार्यक्रमामध्ये अदनान सामी हा बालकलाकार चमकला. प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचा अदनान सामी हा पट्टशिष्य. ही सारी माहिती एवढ्या तपशीलाने देण्याचे कारण की भारतीय संगीताशी इतकी घट्ट पाळेमुळे रुजलेला हा कलावंत केवळ वंशाने पाकिस्तानी होता. काही वर्षांपूर्वीच मोदी सरकारनेच अदनान यांना भारतीय नागरिकत्व सन्मानाने बहाल केले होते. मनसेचा अदनानविरोध समजून घेण्यासारखा आहे कारण या पक्षाने सातत्याने अदनान यांना विरोध दर्शविला आहे. परंतु शिवसेनेच्या पोटदुखीचे नेमके काय कारण असावे? मोदी सरकारने केवळ चमचेगिरीला प्राधान्य देऊन पद्म पुरस्कारांचे वाटप केले अशी टीका हे पक्ष करू लागले आहेत. वस्तुत: हाच पुरस्कार अदनान सामी यांना काँग्रेसी सरकारने दिला असता तर तो सर्वधर्मसमभाव आणि शेजारधर्माचा वस्तुपाठ ठरला असता. अदनान सामी यांचा यथोचित गौरव मोदी सरकारने करावा आणि आपल्या राजकारणावर कुरघोडी करावी याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात दुखले आहे ही खरी वस्तुस्थिती आहे. ‘थोडीसी तो लिफ्ट करादे’ या अदनान यांच्याच शब्दांत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची वेळ आली आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …