उरण ः बातमीदार
शहरातील देऊळवाडी येथे असलेल्या श्री गोपाळकृष्ण वाचनालयात सोमवारी (दि. 28) रात्री चोरी झाली. चोरी झाल्याचे मंगळवारी (दि. 29) सकाळी वाचनालय कर्मचार्यांच्या लक्षात आले.
वाचनालयाच्या लेखनिक वृषाली पाठारे या मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजता वाचनालय उघडण्यास इतर कर्मचार्यांसह गेल्या होत्या. वाचनालयाला मुख्य दोन खोल्या आहेत. एका खोलीचे लॉक उघडल्यानंतर दुसर्या खोलीचे लॉक उघडण्यासाठी त्या गेल्या असता त्यांना त्या दाराचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यांनी आत डोकावून पाहिले असता एक कॉम्प्युटर, दोन कॉम्प्युटर स्क्रीन, रोख रक्कम 14 हजार 400 रुपये, एक इंडक्शन प्लेट व इतर सामान गायब झाल्याचे दिसले. कपाटाचे दारही उघडे होते. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित वरिष्ठ पदाधिकार्यांना कळविले.
कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अॅड. पराग म्हात्रे, उपाध्यक्ष अरुण पाठारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आदी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उरण पोलिसांना याबाबत माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी पाहणी करून पंचनामा केला. अज्ञात चोरट्याविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.