महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले विषाणू
महाबळेश्वर ः वृत्तसंस्था
कोरोना संकटाशी सामना करणार्या महाराष्ट्रात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली असून महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळला आहे. एका वृत्तानुसार, मार्च 2020मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ आढळले होते.
जागतिक आरोग्य संघटनेने रोगांच्या यादीत पहिल्या 10मध्ये निपाह व्हायरसला ठेवले असून तो खासकरून वघवाघुळांमध्येच आढळतो. माणसांपर्यंत हा विषाणू पोहचल्यास मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची शक्यता असते. 2018 मध्ये केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे मृत्यूतांडव झाले होते.
एनआयव्हीने नुकताच अभ्यासात समोर आलेली माहिती प्रसिद्ध केली आहे. यानुसार भारतात आतापर्यंत चार वेळा निपाह व्हायरस समोर आला आहे. या व्हायसरवर कोणतेही औषध किंवा लस नसून तो सर्वांत धोकादायक मानला जातो. यामध्ये मृत्यूदरही खूप आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर एक ते दोन टक्के असून निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर हा 65 ते 100 टक्के इतका आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघुळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते, ज्यामुळे आरोग्यव्यवस्था कोलमडली होती. कोरोनाच्या उद्रेकामागेदेखील वटवाघूळ असल्याचाच दावा आहे.