सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अधिकार्यांना सूचना
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका हद्दीत विविध विकासकामे सुरू आहेत. त्यानुसार या सुरू असणार्या विकासकामांची व पुढील काळात करण्यात येणार्या विकासकामांच्या अनुषंगाने त्या त्या समस्यांची सभागृह नेते परेश ठाकूर पाहणी करीत असतात. यासोबतच पाहणीदरम्यान ते संबंधित अधिकार्यांना सूचना देत असतात. अशाच प्रकारे त्यांचा पाहणी दौरा झाला.
कळंबोली : सभागृह नेते परेश ठाकूर यांनी येथील सेक्टर 12 मधील ख्रिश्चन दफनभूमीची डागडुजी करण्याबाबत अधिकार्यांसह पाहणी केली. या वेळी नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासह पनवेल महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
नवीन पनवेल : येथील राजीव गांधी मैदानात पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या मैदानाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. या वेळी नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, किशोर चौतमोल, शहर अभियंता संजय कटेकर, महापालिकेचे अधिकारी साळुंखे आदी उपस्थित होते.