मागविला कॅमेरा, मिळाला साबण
पनवेल : वार्ताहर
अॅमेझॉन अॅपवरून 60 हजार रुपये किमतीचा कॅमेरा मागविला असता तो न येता साबण, बॅटरी चार्जर व इतर वस्तू आल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत लेंडवे हे सेक्टर 3, कळंबोली येथे राहत असून, त्यांनी अॅमेझॉन अॅपवरून कॅनोन एम फिफ्टी मार्क टू या कंपनीचा कॅमेरा ऑनलाइन हप्त्यावर खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करून ऑर्डर दिली. 59 हजार 990 रुपयांचा कॅमेरा 10 जुलैला डिलिव्हरी होणार असल्याचे दिसले. त्यांना अॅमेझॉन कंपनीच्या फोनवरून एकाचा फोन आला व डिलिव्हरीसाठी आला असल्याचे सांगितले. संध्याकाळी कामावरून घरी आले व चव्हाण यांच्याकडून ऑर्डरचा बॉक्स ताब्यात घेतला. त्यांनी डिलिव्हरी बॉक्स खोलत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बॉक्स खोलला. या वेळी त्यात साबण, कॅनन कंपनीची बॅटरी चार्जर, चार्जर केबल, मॅन्युअल बुक अशा वस्तू होत्या. त्यांनी अॅमेझॉनच्या ग्राहक केंद्राच्या फोनवर फोन करून तक्रार दाखल केली, मात्र तपासणी करून ऑर्डर परत मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारीचे निवारण न झाल्याने व फसवणूक झाल्याने लवंडे यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.