Breaking News

उरण रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग

खारकोपर ते उरण रेल्वेसेवा सुरू होण्याची शक्यता

उरण : रामप्रहर वृत्त

उरण ते बेलापूर या रेल्वे मार्गावरील बेलापूर ते खारकोपर मार्गावरील रेल्वेसेवा सुरू झाली आहे. मात्र खारकोपर ते उरण मार्गावरील कामे प्रलंबित असल्याने हा मार्ग अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. या मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या कामाला सध्या वेग आलेला दिसत आहे. लवकरच ही कामे पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उरण ते बेलापूर (सीवूड्स) दरम्यान लोकल सुरू करण्याची घोषणा 1997 साली झाली होती, मात्र यातील अडथळे निर्माण झाल्याने ती लांबणीवर पडली होती. दोन वर्षांपूर्वी या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते खारकोपर मार्गावर रेल्वेसेवा सुरू झाली आहे. यावेळी लवकरच पुढील सेवा सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र येथील नागरिकांनी विरोध केल्याने या मार्गावरील कामे रखडली होती. दोन महिन्यापूर्वीच जासई परिसरातील या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी सिडकोकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर येथील कामांना वेग आला आहे. उरण रेल्वे स्थानकाचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. सिडको व रेल्वे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा मार्ग तयार होत आहे.

याबाबत सिडकोच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जासईच्या पुढील कामांची जबाबदारी ही रेल्वे विभागाची असल्याने हा मार्ग निश्चितपणे कधी सुरू होणार याची माहिती रेल्वे विभागच देऊ शकतो, असे सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply