Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याच्या कंपनीत मनी लॉण्डरिंग

भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 15) मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत मनी लॉण्डरिंग झाले असल्याचा आरोप केला. त्याचवेळी ठाकरे कुटुंबीयांनीही हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीसोबत व्यवहार केले असल्याचेही सोमय्या या वेळी म्हणाले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, श्रीधर पाटणकर हे श्रीजी होम्स या कंपनीत भागीदार आहेत. या कंपनीकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे एक इमारत उभारण्यात आली आहे. कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या या इमारतीच्या बांधकाम प्रकल्पासाठी श्रीधर पाटणकर यांचा काळा पैसा वापरण्यात आला. या प्रकल्पातील 29 कोटी 62 लाख 29 हजार 320 रुपये हे आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून कंपनीत आले आहेत. त्यासाठी श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची मदत घेतली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीजी होम्स या कंपनीशी आपला काय संबंध आहे हे जाहीर करावे.
ठाकरे परिवारातील आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांचे नंदकिशोर चतुर्वेदी याच्यासोबतचे अनेक आर्थिक व्यवहार बाहेर आले आहेत. मी तपास यंत्रणांच्या अधिकार्‍यांची चर्चा केली आहे. ते नंदकिशोर चतुर्वेदी यांना शोधत आहेत. त्यामुळे नंदकिशोर चतुर्वेर्दीला फरार घोषित करण्यात यावे ही आमची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारचे भ्रष्टाचाराचे पैसे मनी लॉण्डरिंग करण्यात यांनी मदत केली आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
हवाला ऑपरेटर असलेले नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्यातील तीन कंपन्यांमधील व्यवहार मी काही दिवसांपूर्वी समोर आणला होता. ठाकरे कुटुंबीयांनी याबद्दल एक शब्दही उच्चारलेला नाही. तर मग ठाकरे कुटुंबीय नंदकिशोर चतुर्वेदीचा मनी लॉण्डरिंगसाठी वापर करीत होते हे सत्य मानायचे का?, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसांत तपास यंत्रणा नंदकिशोर चतुर्वेदी याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट न्यायालयातून जारी करू शकतील.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply