Breaking News

डॉ. समीर आगलावे यांचे वर्तन आदर्शवत -वाय. टी. देशमुख

पनवेल ः रामप्रहर वृत्त

वैद्यकीय शिक्षणासाठी घेतलेल्या आर्थिक मदतीचा परतावा करीत डॉ. समीर श्रीपत आगलावे यांनी युवा पिढीपुढे आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन  रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 15) येथे केले.

तालुक्यातील कोळवाडी येथील डॉ. समीर आगलावे यांना इंग्लडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकरिता आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या सेवाभावी संस्थेकडून त्यांना दोन लाखांची आर्थिक मदत करण्यात आली होती. आपले शिक्षण पूर्ण करून डॉ. समीर आगलावे सक्षम झाले आहेत, त्यामुळे त्यांनी पुढील गरजवंताला उपयोग होण्याकरिता शिक्षणासाठी घेतलेली रक्कम परत केली. दोन लाखांचा धनादेश डॉ. समीर यांचे वडील श्रीपत आगलावे यांनी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांच्याकडे आज सुपूर्द केला. या वेळी डॉ. समीर आगलावे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते. या वेळी वाय. टी. देशमुख यांनी डॉ. समीर यांच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले कि, उच्च शिक्षण घेण्याकरिता गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. त्या मदतीतून स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम झाल्यावर त्या मदतीचा परतावा केल्यास पुढील गरजवंत विद्यार्थ्याला त्या मदतीचा सदुपयोग होऊ शकतो, त्या अनुषंगाने आवाहन केले जाते. मात्र आजपर्यंत मदत दिलेल्या विद्यार्थ्यांच्या मागे कधीही तगादा लावला नाही, असे असतानाही डॉ. समीर यांनी पुढील गरजूंचा विचार करून स्वतःहून आपल्याला झालेल्या मदतीची परतफेड केली आहे. त्यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा आणि जाणीव समाजासाठी एक आदर्श आहे, असेही त्यांनी बोलताना अधोरेखित केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply