माणगावात चार किमीपर्यंत वाहतूक कोंडी; पोलिसांची दमछाक
माणगाव : प्रतिनिधी
गुरुवारपासून सलग चार दिवस सुट्ट्या लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. माणगावात परिसरातील महामार्गावर शुक्रवारी (दि. 15) सकाळपासूनच वाहनांच्या सुमारे चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची पुरती दमछाक झाली. बायपासचे काम मार्गी लागले तर माणगावमध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.
माणगाव हे दक्षिण रायगडातील मध्यवर्ती ठिकाण असून येथून दिघी-पुणे राज्यमार्ग, माणगाव-पुणे मार्ग व मुंबई-गोवा महामार्ग तसेच जवळील इंदापूर येथून मुरूड-आगरदांडा मार्ग जात असल्याने या परिसरात विशेषतः सुट्टीच्या काळात वाहनांची गर्दी असते. तसेच गणेशोत्सव व होळी, धुलिवंदन सणासाठी चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गाने कोकणात येत असतात. त्यामुळे माणगाव परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. आताही गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शुक्रवारी गुडफ्रायडे याला जोडून पुढे शनिवार व रविवार अशा सलग चार दिवस सुट्ट्या असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यातच महामार्गावर वाहनांच्या चार चार लाईन लागल्याने दुचाकीस्वारांनाही महामार्गावरून जाणे कठीण होऊन बसले होते.
वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळेही माणगावात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. महामार्गावरून वाहनांच्या दोन लाईन गेल्यास वाहतूक कोंडीला निश्चितच आळा बसेल. परंतु बेशिस्त वाहनचालक तीन चार लाईन करून दुचाकीस्वारांनाही अडचण निर्माण करतात. अशा परिस्थितीत महामार्गावर तिसरी व चौथी लाईन करून बाहेर पडलेल्या चारचाकी वाहनचालकांवर माणगाव वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.