Breaking News

होळी, धुळवडीसाठी बाजारपेठा सजल्या

पनवेल : वार्ताहर
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील बाजारपेठा विविध साहित्याने सजल्या आहे. होळीसह धुलिवंदन व रंगपंचमीनिमित्त रंग, पिचकारी घेण्यासाठी ग्राहकांचीही लगबग सुरू झाली आहे.
आनंद व उत्साहाचा होलिकोत्सव यंदा 6 मार्च रोजी आहे. परंपरा जपणार्‍या या सणाची कोकणात सुरुवात झाली आहे. याचा उत्साह गावागावातून दिसत असून गावकरी विशेषतः तरुण यात सहभागी होत आहेत. कोकणात त्याला शिमगोत्सव म्हणून ओळखले जाते. शहरांतूनही तो साजरा केला जातो. रचलेल्या होळीला फुलांची आरास करून गाठी व इतर गोड वस्तूंचा नैवेद्य दाखविला जातो. मग बरोबर 12 वाजता होळी पेटविली जाते.
होळीनंतर दुसर्‍या दिवशी धुळवड असते. त्याकरिता विविध प्रकारचे रंग, लहानग्यांचे आकर्षण असणार्‍या पिचकार्‍यांनी बाजारपेठ फुलली आहे. बाजारात नैसर्गिक रंगांना अधिक मागणी आहे. नैसर्गिक सुके रंग 80 ते 100 रुपये, ओले रंग 180 रुपयांना उपलब्ध आहेत, तर सुमारे 30 ते 500 रुपयांपर्यंत बाजारात विविध प्रकारच्या पिचकार्‍या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकार्‍या लक्ष वेधून घेत आहेत. यंदा पब्जी या खेळाच्या पिचकारीची लहानग्यांमध्ये अधिक क्रेझ आहे. विविध डिझाइनच्या पिचकार्‍या 80 ते 450 रुपयांना, तर पब्जी पिचकारी 190 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
कलरसाठी मिनी थंडर व भंडर अशा दोन प्रकारच्या स्प्रेला ग्राहकांकडून मागणी असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. हॅपी होली लिहिलेल्या वैविध्यपूर्ण पिवळ्या रंगाची टोपी, छुमंतर जादू कलर हा नवीन ब्रॅण्डही आला आहे. पिचकारीमध्ये टाकण्यासाठी परफ्युम लिक्विड रंग उपलब्ध आहे. रासायनिक रंग दोन-तीन दिवस शरीरावर तसाच राहतो. त्यामुळे या रंगाला मागणी कमी आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे सर्व प्रकारच्या रंगांच्या दरात सुमारे 10 टक्के वाढ झाली आहे. तरीही खरेदीसाठी बच्चेकंपनीसह पालकांची पावले बाजाराकडे वळू लागली आहेत.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply