पनवेल ः वार्ताहर
पनवेल बस डेपोजवळील बालाजी आंगण सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. येथे गेल्या काही दिवसांपासून दोन माकडांनी प्रवेश करून नुसता हैदोस मांडला असून त्यामुळे तेथे राहणार्या गृहिणी अतिशय त्रस्त झाल्या आहेत. यासंदर्भात सोसायटीच्या पदाधिकार्यांनी वनविभागाकडे तक्रार केली असून याबाबत कधी माकडांना जेरबंद करण्यात येईल, याकडेच सोसायटीचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून या सोसायटीच्या आवारात दोन माकडांनी प्रवेश केला असून ते 13व्या मजल्यावर धुमाकूळ घालत आहेत. घराघरात जाऊन घरातील वस्तूंची नासधूस करणे हे काम त्यांचे सुरू आहे. त्याचा त्रास रहिवाशांसह घरात असणार्या गृहिणीवर्गांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे इमारतीमधील आबालवृद्धांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे. तरी वनविभाग महाराष्ट्र शासन तसेच पनवेल महानगरपालिका यांनी लक्ष घालून या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सोसायटीच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आली आहे.