मुंबई ः प्रतिनिधी
भारताच्या यजमानपदाखाली 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत होणार्या कुमारी (17 वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांसाठी नवी मुंबईसह भुवनेश्वर आणि गोवा या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका झुरिच येथे 24 जूनला जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या साथीमुळे 2020मध्ये स्पर्धा रद्द करण्यात आल्यानंतर फिफा, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि स्थानिक संयोजन समितीने सामन्यांच्या शहरांची नावे निश्चित केली आहेत. ‘खेळाडू आणि अन्य सदस्यांच्या सुरक्षेची काळजी घेत भुवनेश्वर येथील किलगा स्टेडियम, गोवा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सामने रंगतील,’ असे स्थानिक संयोजन समितीने म्हटले आहे. सध्या आयपीएल सुरू असून यातील काही सामने डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळले जात आहे. भारतासह ब्राझील, चिली, चीन, कोलंबिया, जपान आणि न्यूझीलंड या सहा देशांनी स्पर्धेतील सहभाग निश्चित केला आहे. एकूण 16 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेची पात्रता स्पर्धा सुरू आहे.