महाड तालुक्यातील अनेक भागात भातपिक घेतल्यानंतर त्याच शेतजमिनीत कडधान्यांची पूरकशेती केली जाते. येथील भातपिकांचे उत्पादन मोठे नसले तरी कडधान्याला मात्र बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने येथील शेतकरी कडधान्य पिक घेतात. मागणी आणि दर उत्तम असला तरी शेतकरी कडधान्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात अमरवेल पसरत असून अमरवेलचा हा विळखा वाढतच चालल्याने शेतकर्यांना मोठी डोकेदुखी सुरू झाली आहे. महाडमधील शेतकरी पावसाळयात मोठ्या प्रमाणात भात पीकांची लागवड करतात. पारंपरीक पध्दतीने केली जाणारी ही भात शेती येथील शेतकर्यांचे उत्पन्नाचे साधन नसून हे भाताचे पिक केवळ घरी खाण्यासाठी वापरात येते. पण खरीप हंगामात येथील शेतकरी कडधान्याची शेती करतो यामध्ये तुर, मुग, पावटा, वाल, मटकी, चवळी, हरभरा इत्यादीची लागवड केली जाते. या पिकाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असून चांगला भाव देखिल मिळतो. त्यामुळे दळी जमीनी व्यतीरीक्त नदी, ओढे, बंधार्या शेजारील शेत जमीनींमध्ये कडधान्याची लागवड येथील शेतकरी करताना दिसत आहे. महाड तालुक्यातील दासगाव खाडीपट्टा, वरंध विभाग, बिरवाडी, वाळण, नाते विभाग आदी परीसरात कडधान्याची लागवड केली जाते. या कडधान्यामध्ये वाल अगर पावट्याला थंडीच्या दिवसात पोपटी करता फार मागणी आहे. कडधान्याचे पिक फायद्यात असताना देखील शेतकरी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. या दुर्लक्षामुळे परजिवी वर्गातील अमरवेलचा विळखा मोठ्या प्रमाणवार दिसू लागला आहे. अमरवेल ही पर्णहीन परजीवी वनस्पती आहे. ही वनस्पती औषधी असून तीचा वापर पित्त विकार, चर्मरोग, अमांश, मुत्रविकार इत्यादीवर गुणकारी आहे. हिला वाढण्याकरीता कोणत्याही झाडाच्या खोडाची गरज भासते. ही वनस्पती म्हणजे पिवळया, पोपटी रंगाचे शाखा युक्त वेलीचे जाळे असते. ती इतर वनस्पतीवर वाढताना अपली लहान नाजुक शोषके त्या वनस्पतीच्या खोडात घुसवून पौष्टीक अन्न घटक शोषून घेते. यामुळे अमरवेल वाढते मात्र त्यामुळे झाडाचे अगर पिकाचे मोठे नुकसान होते. अमरवेल पिकातील पोषक तत्व शोषून घेत असल्याने येणारे कडधान्य चांगल्या दर्जाचे येत नाही. या वनस्पतीच्या निमुर्लनासाठी कोणतेच प्रभावी औषध अगर तण नाशक बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे वेळोवेळी लक्ष ठेउन ही वनस्पती ओढून काढायची आणि तीचा नाश करायचा हा एकच उपाय आहे. मात्र येथील शेतकरी शेताकडे दुर्लक्ष करत असल्याचे जाणवत आहे. अमरवेलीच्या बिजाचा प्रसार पक्षी करत असल्याने आणि अमरवेलीच्या बियांचा सुक्त कालावधी सुमारे दहा वर्षाचा असल्याने याबाबत केवळ शेतकरीच नव्हे तर कृषी विभागाने सक्रीय होवून उपाय योजनांचा ठोस कार्यक्रम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. अमरवेल आटोक्यात आणण्यावर ठोस उपाय निघालेला नाही. अमरवेलीचे मुळ शेतातून नांगरणीनंतर देखील नष्ट होत नाही त्यामुळे शेतकर्यांनी वेळोवेळी पिकाबदल करणे गरजेचे आहे. हरभरा या कडधान्यावर नैसर्गीकरित्या तयार होणार्या आममळे अमरवेलीचा प्रादुर्भाव होत नाही. यामुळे शेतकर्यांनी हरभर्याची लागवड करावी, असा सल्ला कृषी विभाग देत आहे. मात्र तरी देखील तालुक्यातील शेतीवरील संकटाचे निर्मुलन होताना दिसत नाही. अमरवेल या परजीवीमुळे पिकांचे नुकसान तर होते तसेच ही वनस्पती पिकांबरोबर फळ झाडांवर देखील आक्रमण करते. मात्र मोठी झाडे या आक्रमणासमोर तग धरुन राहतात, मात्र कडधान्य पिकांचे तसे नाही होत. एकदाका पिकावर या परजीवीचे आक्रमण झाले तर नुकसान अटळ आहे. महाडमधील शेती सततच्या येणार्या पुरामुळे आणि वाढलेल्या मजुरीमुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पडीक जमीनीवर गवत, कशेड फोपावत आहे. शेतकरी शेती सोडून अन्य नोकरी धंद्याच्या मागे लागत आहे. भविष्यात जर कोणीच शेती केली नाही तर अन्न कोढून येणार आणि इतर देशांप्रमाणे भारताला देखील इतर देशांकडून अन्नधान्य आयात करावे लागेल. त्यावेळी लोकांना शेतीचे महत्त्व कळेल. शेतकरी जगला तरच शेती होऊ शकेल आणि लोकांना अन्नधान्य मिळेल. त्यामुळे शेतकर्यांसमोर येणारी ही संकटे समाजासमोरील संकटे असून सगळ्या समाजासह शासनाने या साठी शेतकर्यांला मदत केली पाहिजे.
-महेश शिंदे