पनवेल : प्रतिनिधी
पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर करण्याबाबात निर्णय हा महासभेत चर्चा केल्याशिवाय होऊ शक्त नाही. आयुक्त एकतर्फी असा निर्णय घेऊ शकत नसल्याने कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार नसल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार असल्याची बातमी आयुक्तांचा हवाला देऊन एका वर्तमानपत्रात शुक्रवारी प्रसिद्ध झाल्याने पनवेलमधील कोळी बांधवांमध्ये खळबळ उडाली. पनवेल कोळीवाड्यातील 99 टक्के कुटुंबांचा मुख्य व्यवसाय हा मासळी विक्री असल्याने येथील बाजार स्थलांतरित झाल्यास त्यांच्या अर्थकारणावर परिणाम होणार असल्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे सभागृह नेते परेश ठाकुर यांनी सकाळी उरण नाक्यावरील मासळी बाजार येथे जाऊन तेथील कोळी बांधवांची भेट घेतली. या वेळी परेश ठाकूर यांनी पनवेल शहरात असलेला मासळी बाजार हलवण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करून असा कोणताही निर्णय सत्ताधारी भाजप आणि रिपब्लिकन पक्षाने घेतलेला नाही. याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसून, अशी चर्चा करताना येथील कोळी समाजाला आणि पंच कमिटीला विश्वासात घेतल्याशिवाय चर्चा केली जाणार नाही. विरोधकांना काम नसल्याने त्यांनी ही अफवा पसरवली आहे. आयुक्त अशा प्रकारचा निर्णय एकतर्फी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे कोळी बांधवांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे परेश ठाकूर म्हणाले. पनवेल महापालिका हद्दीत आणखी पाच-सहा मासळी बाजार बांधणे आवश्यक असल्याचे आमचे मत आहे. या मासळी बाजारातील स्वच्छता राखणे हे महापालिकेचे काम आहे. आम्ही ते महापालिका प्रशासनाकडून करून घेऊ, असेही परेश ठाकूर यांनी कोळी भगिनींना आणि पंच कमिटी सदस्यांना सांगितले.