पनवेल : प्रतिनिधी
आम्ही तिघे रात्री 10 वाजता सायनहून निघालो आहोत. माझी आई आजारी आहे. ती गावाला एकटीच आहे, त्यामुळे आम्हाला काही करून घरी जायचे आहे. पनवेल एसटी स्टँडवर दुपारी 12 वाजता आपल्या दोन वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेली महिला सांगत होती. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील उसरघर येथील मूळ रहिवासी असलेल्या जयश्री ढेपे मुंबईत सायनला आपल्या कुटुंबासह राहतात. कोरोनामुळे मुंबई लॉकडाऊन केल्यामुळे त्यांच्या पतीला आणि वडीलांना काम नाही. गावाला त्यांची आई आणि शाळेत जाणारा लहान भाऊ राहतो. आईला बरे नसते तिला औषधे न मिळाल्यास तिची तब्बेत बिघडते. मुंबई लॉकडाऊन झाल्यामुळे गावाला औषधे पाठवता आली नाहीत, त्यामुळे तिची तब्बेत बिघडली. घरी फक्त लहान भाऊ. त्या आपले पती, दोन वर्षांची मुलगी आणि वडील यांच्याबरोबर मंगळवारी रात्री 10 वाजता गावाला जायला चालत निघाल्या. असे सांगत असल्या तरी खरे कारण मुंबईतील कोरोनाच्या भीतीने त्या गावाला निघाल्या असल्याचे स्पष्ट दिसत होते. सायनहून रात्री 10-12 जणांचा ग्रुप गावाला जायला निघाल्यावर नाक्यानाक्यावर पोलीस अडवत असल्याने गल्लीबोळातून रस्ता काढत काही ठिकाणी रेल्वे मार्गावरून चालत त्यांनी गावाची वाट धरली होती. चेंबूरजवळ रेल्वे मार्गावर काही टारगट तरूण अडवत असल्याचे समजल्याने पुन्हा रस्त्यावरुन चालत असे करीत रात्री 12 नंतर वाशी पुलाजवळ आले. पोलीस अडवत असल्याने दोघे-दोघे जण काही अंतर राखून पूल ओलांडला. त्यावेळी वाशीला 50-60 जण माणगाव तालुक्यात जाण्यासाठी जमले होते. पोलीस सगळ्यांना परत पाठवीत होते. पण पोलिसांना चुकवून पुन्हा रस्ता तर कधी रेल्वे लाईनवरुन चालत खारघरला आले. त्याठिकाणी खूप काळोख असल्याने थोडावेळ थांबले. उजाडल्यावर पुन्हा चालायला सुरुवात केली. 12 वाजता पनवेल स्टँडवर पोहचले. पण पुढे जायला एसटीची गाडी नाही. म्हणूण मुलीला मांडीवर घेऊन जयश्री ढेपे बसल्या होत्या. वडील खाजगी गाडी मिळते का बघायला गेले होते. तेवढ्यात वडील खाजगी गाडीवाला प्रत्येकी एक हजार रुपये मागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी स्टँडवर बसलेल्या एका व्यक्तीने त्यांना जित्याहून गाडी मिळेल असे सांगितले. त्यांना कोणतीही गाडी मिळणार नाही असे सांगूनही पटले नाही. आमच्या इथले काही जण रविवारी निघालेत ते आज गावाला पोहचलेत. आम्ही चालत चालत गावाला जाऊ कितीही दिवस लागू द्या. मुंबईत मरण्यापेक्षा गाव बरा, असे म्हणून त्या कुटुंबाने पुन्हा रस्त्याने चालायला सुरुवात केली.