लाभार्थी 13 गावांना टँकरने पाणीपुरवठा
15 टँकरद्वारे भागवली जातेय तहान
शासनदरबारी मात्र तालुका पाणीटंचाईमुक्त
रोहे : महादेव सरसंबे
तालुक्यातील कुंडलिका नदीतीरावरील 26 गावांसाठी एमआयडीसीकडून 26 गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील 13 गावांना सध्या पाणी मिळत नसल्याने तेथे एमआयडीसीकडून टँकरने पाणीपुरवठा केले जात आहे, मात्र पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्यासाठी मागणी नसल्याने रोहा हा पाणीटंचाई मुक्त तालुका असल्याचा विरोधाभास पहावयास मिळत आहे.
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातून बाहेर पडणार्या सांडपाण्यामुळे रोहा तालुक्यातील बारमाही वाहणारी कुंडलिका नदी दुषीत झाली. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत दुषित झाल्याने एमआयडीसीने या गांवाना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार एमआयडीसीच्या माध्यमातून एमजीपीच्या सहकार्याने 26 गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेतून पडम, खारापटी, निडी, भातसई, झोळांबे, लक्ष्मीनगर, शेणवई, डोंगरी, शेणवई आदिवासीवाडी, वावेखार, वावेपोटगे, यशवंतखार, सानेगाव, दापोली, कोपरी, धोंडखार आदी 26 गावांना सुरळीत पाणी पुरवठा व्होवु लागला. काही कालावधीनंतर व आता या गावांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे या गावांना पाणीटंचाई निर्माण झाली. या योजनेसंदर्भात तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु कोणतेही सकारात्मक फलित पुढे आले नाही. आज भातसई, झोळांबे, लक्ष्मीनगर, शेणवई आदिवासीवाडी, शेणवई, डोंगरी, वावेखार, वावेपोटगे, सानेगाव, दापोली, कोपरी, करंजवीरा आदी 13 गावांना 15 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
उन्हाळा वाढला आहे. त्यामुळे रोहा तालुक्यात प्रचंड उकाडा जाणवत आहे. सर्वत्र उत्सव, सण, यात्रा, जत्रा चालू आहेत. अशा वेळी या गावांना पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आपण पाणी आणले आहे, आम्ही योजना मंजूर केली, आम्ही या भागाला पाणीपुरवठा करू अशा पध्दतीने सातत्याने ग्रामस्थांना सांगत आहेत. परंतु प्रत्यक्षात या गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे रोहा पंचायत समितीकडून तालुका पाणीटंचाई मुक्त आहे, असे सांगण्यात येत आहे.