Breaking News

श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम

पनवेल परिसर झाला चकाचक

पनवेल : वार्ताहर

महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल पसिररात महास्वच्छता अभियान राबवून सुमारे 11 टन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात 4193 श्री सदस्यांनी श्रमदान केले. हे महास्वच्छता अभियान पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने राबवण्यात आले. पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे परिसरात बुधवारी श्री सदस्यांनी महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात महास्वच्छता अभियान राबविले. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेसाठी जनजागृती निर्माण करण्याकरिता या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल परिसरात राबवलेल्या या स्वच्छता अभियानात चार हजार 193 श्री सदस्यांनी एकत्रित येत पंचमुखी हनुमान मंदिर, डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल, उपजिल्हा रुग्नालय, पनवेल एस.टी आगार, पंचरत्न सर्कल, वडाळे तलाव, पनवेल रेल्वे स्थानक, गांधी हॉस्पिटल, लाईनआळी यांच्यासह कामोठे आणि खांदा कॉलनी परिसरातून सुमारे 11 टन कचरा गोळा केला. या स्वच्छता अभियानाला लागणारे संपूर्ण साहित्य डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या कडून देण्यात आले. या अभियानात विविध राजकीय, सामाजिक संघटना तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

उरणमध्ये 13.8 टन ओला, 23.16 टन सुका कचरा जमा

उरण : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने आणि डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने उरण येथे स्वच्छतेची मोहीम 1 मार्च रोजी आखण्यात आली होती. या वेळी उरण शहर परिसर स्वच्छ करण्यासाठी अनेक श्री सदस्यांनी आपल्या हातात झाडू घेऊन, परिसर स्वच्छ केला. यात प्रामुख्याने, उरण मधील उरणपंचायत समिती कार्यालय परिसर, इंदिरा गांधी रुग्णालय परिसर, उरण न्यायालय परिसर, उरण तहसील कार्यालय परिसर, उरण नगर परिषद परिसर, उरण नगर परिषदेच्या शाळेचा परिसर, वीर सावरकर मैदान परिसर, आयटीआय परिसर, उरण बस स्टॅन्ड परिसर ओ एन जी सी परिसर आणि उरण शहरातील रस्ते आदी भागात उरण तालुका परिसरातील हजारो श्री सदस्यांनी पुढाकार घेऊन ही स्वच्छता मोहीम आखली होती. 1876 श्री सदस्यांनी हातात झाडू, घमेले  व फावडे घेऊन, तसेच जे.सी.बी .चा वापर करत कचर्‍याचे ढिगारे उचलण्यात आले. यात साधारणता 13.8 टन ओला कचरा आणि 23.16 टन सुका कचरा उचलून, हा उरणचा परिसर स्वच्छ केला.

संपूर्ण महाराष्ट्रात अभियान

उन्हाची तमा न बाळगता श्री सदस्यांचे हा उरणचा परिसर स्वच्छ करण्यासाठी हात पुढे सरसावत होते. हा परिसर स्वच्छ करताना त्यांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे समाधान दिसून येत होते. आपण चांगले काम करीत आहोत. हा परिसर स्वच्छ झाला की रोगराई पसरणार नाही. यामुळे माणूस निरोगी राहील आणि माणसाला उत्तम आरोग्य लाभण्यास मदत होत राहील. या विचाराने हजारो श्री सदस्य ही स्वच्छतेची साफसफाई करण्यामध्ये व्यस्त झाले होते. हे स्वच्छता अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले होते.

रसायनी परिसरात एकोप्याचे दर्शन

मोहोपाडा : रसायनी पाताळगंगासह कोन विभागातील हजारो श्री सदस्यांनी सकाळपासूनच उपस्थित राहून स्वच्छता मोहीम राबविली. हि मोहिम बुधवारी (दि. 1 मार्च) सकाळी महाराष्ट्रासह परदेशातही राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेमुळे परिसरातील शासकीय कार्यालये व रस्ते चकाचक झाल्याचे दिसून आले. या वेळी स्वच्छता मोहीम राबविताना एकोप्याचे दर्शन झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे यावेळी श्री सदस्यांकडून जमा झालेल्या कचर्‍याची योग्य विल्हेवाटही लावण्यात आली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छतेसाठी रसायनी कोन विभागातील ठिकठिकाणच्या हजारो श्री समर्थ अनुयायांनी उपस्थित राहून महास्वच्छता मोहीम राबविल्याने जनमानसातून लोकप्रियता मिळत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply