ग्रामीण भागातही सेवा होणार सुरू
पेण : प्रतिनिधी
न्यायालय आणि राज्य सरकारने कर्मचार्यांना कामावर हजर होण्याचे निर्देश दिल्यानंतर एसटीच्या रायगड विभागातील आठ आगारांमधील जवळपास सर्व गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
विविध मागण्यांसाठी कर्मचार्यांनी आंदोलन पुकारल्याने पाच महिन्यांपासून ठप्प असणारी एसटी सेवा पुन्हा पूर्वपदावर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रायगड विभागातील पेण, अलिबाग, रोहा माणगाव, श्रीवर्धन, महाड, मुरुड, कर्जत या आठ आगारांतील अनेक कर्मचारी कामावर हजर झाले असून पेणमध्ये 100 टक्के कर्मचारी रुजू झाले आहेत. रायगड विभागात सुमारे 90 टक्क्यांच्यावर एसटी सेवा सुरू झाली असून दरदिवशी उत्पन्नात वाढ होत आहे.
पेण आगाराच्या गाड्या जास्त प्रमाणात सुरू झाल्या असून, लवकरच ग्रामीण भागातही सदर एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या धावू लागल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. निलंबित कर्मचार्यांना सेवेत पुन्हा संधी देण्याची कार्यवाही सुरू आहे. -अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, पेण