Breaking News

केवाळे, हरिग्राम घाट स्वच्छ

गाढी नदी संवर्धनाचा दुसरा टप्पा यशस्वी

पनवेल : बातमीदार

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू केलेल्या गाढी नदी स्वच्छतेचा दुसरा टप्पा रविवारी उत्साहात पार पडला. गाढी नदीला लागून असलेल्या हरिग्राम, केवाळे घाट परिसरातील अस्वच्छता दूर करण्यात आली. काही स्थानिक नागरिकांनीदेखील या उपक्रमाला प्रतिसाद दिला.

पनवेलच्या गाढी नदीला पूर्वीचे प्रदूषणविरहित रूप आणण्यासाठी पनवेल निसर्गमित्र संघटनेने पाऊल उचलले असून चिपळे पुलाखालील कचरा काढून ही जागा स्वच्छ करण्यात आली. याच उपक्रमाचा दुसरा टप्पा 5 मे रोजी झाला. या श्रमदानात निसर्गमित्र संघटनेचे स्वयंसेवक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. धनंजय मदन यांच्या नेतृत्वाखाली चिपळे पुलाखालील उर्वरित काम पूर्ण करण्यात आले, तर चिपळे पूल ते हरिग्राम नदी पात्रातील रस्त्यावरची स्वच्छता सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. किशोर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार हरिग्राम गावच्या विसर्जन घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली.

घाट परिसरात कचरा स्वच्छ करून नदीत होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न निसर्गमित्र संघटनेच्या सदस्यांनी केला आहे. केवाळे गावाच्या विसर्जन घाटाचीही स्वच्छता करण्यात आली. अरविंद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या तिन्ही ठिकाणी अनेक गोण्या भरून कचरा काढण्यात आला. नदीपात्रात टाकण्यात आलेल्या दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. स्वच्छतेच्या तिसर्‍या टप्प्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सचिन शिंदे यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply