Breaking News

बेडीसगावचा खोदलेला रस्ता जैसे थै!

आदिवासींची शासनाकडून फसवणूक, महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील बेडीसगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचा रस्ता जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदून गायब करण्यात आला होता. त्यानंतर जुना रस्ता पुन्हा तयार करून द्यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी 4 एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी सात दिवसात रस्ता तयार करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषदेने दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र शासकीय यंत्रणेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आदिवासी सेवा संघाचे कार्यकर्ते महाराष्ट्र दिनापासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करणार आहेत.

कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील नऊ आदिवासी वाड्यांकडे जाणार्‍या रस्त्याचा 140 मीटर लांबीचा भाग वांगणी गावातील अज्ञात व्यक्तींनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने गायब केला होता. त्यानंतर जुना रस्ता पुन्हा तयार करावा, यासाठी आदिवासी ग्रामस्थांनी संबंधीत शासकीय कार्यालयांना विनंती अर्ज दिले आहेत. मात्र रस्त्याचा काही भाग गायब करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही.

तर रस्ता तयार करण्याबाबतदेखील शासकीय यंत्रणेकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे आदिवासी सेवा संघाच्या तीन कार्यकर्त्यांसह आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांनी 4 एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर शासकीय यंत्रणा कामाला लागली. सात दिवसात जुना रस्ता होता तसाच तयार करून देण्याचे लेखी पत्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र त्याला 20 दिवसांचा कालावधी लोटला तरी बेडीसगावकडे जाणार्‍या रस्त्याचा भाग संबंधितांनी तयार करून दिला नाही. त्यामुळे शासनाकडून आपली फसवणूक झाल्याची भावना बेडीसगाव परिसरातील आदिवासी बांधवांत निर्माण झाली आहे.

दरम्यान, आपला जुना रस्ता पुन्हा तयार करून द्यावा आणि रस्ता खोदणार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आदिवासी सेवा संघाचे रायगड जिल्हा सचिव गणेश पारधी, कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी आणि बेडीसगाव येथील ग्रामस्थ मंगळ दरवडा हे महाराष्ट्र दिनी (1 मे) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करणार आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply