Thursday , March 23 2023
Breaking News

तुकोबांच्या नामघोषाने देहू दुमदुमले

लक्ष लक्ष नेत्रांनी अनुभवला बीज सोहळा

श्रीक्षेत्र देहू : प्रतिनिधी : इंद्रायणी तीरावरील वैकुंठस्थान येथे तुकाराम-तुकाराम असा आसमंत दणाणणारा जयघोष…, माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षावर झालेली बेल-लाह्या फुलांची उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला.

श्री संत तुकाराम महाराजांचा 371 वा बीजोत्सव सोहळ्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून भाविक देहूनगरीत दाखल झाले आहेत. भजन, कीर्तन आणि प्रवचनाने देहूनगरी भक्तिमय झाली आहे. इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर दिंडीकरी व फडकरी यांचे ठिकठिकाणी गाथा पारायण सुरू आहे. सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानासह ग्रामपंचायत प्रशासन व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले. कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

संस्थानाच्या वतीने पहाटे 3 वा. काकड आरती, 4 वाजता श्रींची महापूजा संस्थानाचे अध्यक्ष, विश्वस्त व महाराजांचे वंशज यांच्या हस्ते झाली. पहाटे 6 वा श्री संत तुकाराम महाराज मंदिरातील

महापूजा झाली. साडेदहाला देऊळवाड्यातून पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान झाले. माध्यान्ही सूर्य येताच वैकुंठगमन सोहळा प्रसंगावर देहूकर महाराजांचे कीर्तन सुरू होते. त्याच वेळी इंद्रायणी तीरावरील वैकुंठस्थान येथे तुकाराम-तुकाराम असा आसमंत दणाणणारा जयघोष झाला. माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षावर झालेली बेल-लाह्या फुलांची उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. त्यानंतर दुपारी साडेबाराला पालखी परत मुख्य मंदिरात आली. भाविकांच्या गर्दीने इंद्रायणी तीर फुलून गेला होता. अपूर्व उत्साह जाणवत होता. रात्री व सकाळी पारंपरिक फड आणि दिंड्या यांचे कीर्तन कार्यक्रम, मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर आणि जन्मस्थान मंदिर परिसरात होणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे यांनी सांगितले. हरिनामाच्या गजरात बरोबर 12 वाजून 8 मिनिटांनी नांगदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, तसेच पार्थ पवार यांच्यासह पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, अपर तहसीलदार गीता गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply