पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने उडविलेली दाणादाण यामुळे कोकणात होत्याचे नव्हते झाले. नेहमी पर्यटकांनी गजबजलेले रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्यांवर सध्या भयाण शांतता पसरली आहे. विशेष म्हणजे पर्यटन व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला आहे.
सध्या समुद्र किनारी भागात जिकडे पहावे तिकडे मोडलेली नारळी-फोफळीची झाडे आणि पडझड झालेली दुकाने दिसत आहेत. निसर्ग चक्रीवादळाने केवळ काही तासांत हिरव्यागार वनराईने नटलेल्या या किनार्यांना विद्रुप करून टाकले आहे. दिवेआगर, मुरूड, काशिद, वरसोली या प्रमुख किनार्यांवरील 20 ते 30 वर्षांपूर्वी लावलेली मोठ-मोठी झाडे उद्धवस्त झाली आहेत. रस्त्यावरच पडलेली इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की तीच दूर करताना एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाला करसत करावी लागत आहे. यातून समुद्र किनार्यावरील झाडे बाजूला करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. या पडझडीतून दुकानदारांचेही आर्थिक नुकसान भरून निघण्यासारखे नाही. झालेल्या नुकसानीकडे हताशपणे पाहात राहण्याशिवाय दुसरा मार्ग या दुकानदारांकडे शिल्लक राहिलेला नाही.
समृद्ध वनसंपदा येथील पर्यटनाचे आकर्षण राहिलेले आहे. सुरू, नारळ व फोफळीच्या बागांमध्ये येणारे पर्यटक मनसोक्त मौजमजा करीत समुद्रस्नानाचा आनंद लुटत असतात. हे वैभव निसर्ग चक्रीवादळामुळे लयाला गेले आहे. काशिद समुद्र किनार्यावर पडलेल्या सुरूच्या झाडांची संख्या साधारण शंभरच्या आसपास आहे. मुरूड किनार्यावर तीनशेपर्यंत झाडे पडलेली आहे. दिवेआगर किनारपट्टीवर ही संख्या पाचशेच्या आसपास आहे. जिकडे पहावे तिकडे आडवी पडलेली झाडेच झाडे दिसत आहेत. ही वनराई मुळस्थितीत येण्यासाठी काही दशके लागणार असल्याने येथील पर्यटन व्यवसायाला जबर फटका बसण्याची शक्यता आहे.
रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यावर पहिले तीन दिवस प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर धोकादायक झाडे दूर करण्याचे काम सुरू आहे. समुद्रकिनार्यांवर मोठ्या प्रमाणात झाडे पडलेली आहेत, तीदेखील बाजूला केली जातील.
-पी. एम. नेमाणे, एनडीआरएफ टीम