पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवार (दि. 25) सकाळी 11.30 वाजता अध्यक्ष नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, जगदीश गायकवाड, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, गणेश कडू, अरविंद म्हात्रे, सतीश पाटील व इतर सदस्य, उपायुक्त कैलास गावडे, कल्पता पिंपळे व इतर अधिकारी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील आरटीपीसीआर केंद्रामध्ये लागणार्या मनुष्यबळाच्या दरास मान्यता देणे, पनवेल महानगरपालिकेचा तीन वर्षांचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करण्याचे काम पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागास देणे, आयआयटी बॉम्बे या संस्थेस देण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील समिती क, प्रभाग क्र.13मधील जुई गावामध्ये मल:निस्सारण वाहिन्या टाकणे, पंम्पिग स्टेशन बांधणे, मलप्रक्रिया केंद्र उभारण्यास व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ मधील ओवे कॅम्प गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग समिती ब मधील वळवली गावात रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाला तसेच प्रभाग क्र.19मधील गुरुशरणम इमारती समोरील रस्त्याचे व पावसाळी गटाराचे उन्नतीकरण करण्याच्या कामास स्थायी समितीने मंजुरी दिली.
पनवेल महानगरपालिका अंतर्गत क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर भाडे तत्त्वावर पुरविण्याच्या कामाकरिता वाढीव खर्चास सुधारीत प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी तरतूद योजनेअंतर्गत व महानगरपालिका निधीतून भिंगारी येथे प्राथमिक शाळा चार वर्गखोल्या बांधण्याला मंजुरी दिली.
महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ-प्रभाग क्र.2 देवीचापाडा येथे गटार, रस्ता डांबरीकरण आणि समाजमंदिराचे बांधकाम करणे, पेंधर गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व गटार बनविणे, पालेखुर्द गावातील गणेश मंदिर ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण करणे व आरसीसी गटार बांधणे, घोटचाळ गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण प्रभाग समिती क प्रभाग क्र. 14 मधील भूखंड क्र.04, सेक्टर-16, नविन पनवेल (प) या भूखंडावर पनवेल महानगरपालिका मुख्यालय बांधणे या कामाच्या वास्तूविशारद, सल्लागारांच्या फीबाबत व महानगरपालिका मालकीच्या पथदिव्यांची दोन वर्षांकरिता निगा, दुरूस्ती, परिचलन, सुधारणा व नूतनीकरण करणे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी तरतूद योजनेअंतर्गत व महानगरपालिका निधीतून मुर्बी (खारघर) येथील प्राथमिक शाळा तीन वर्गखोल्या बांधणे, महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी तरतूद योजनेअंतर्गत व महानगरपालिका निधीतून वळवली येथील प्राथमिक शाळा तीन वर्गखोल्या बांधण्याच्या कामास स्थायी समितीने मंजुरी दिली.
वाढीव खर्चाचा विषय स्थगित
महानगरपालिका क्षेत्रातील (पनवेल शहर वगळता) पाणीपुरवठा परिचालनासाठी व देखभाल दुरूस्तीकरिता मुनष्यबळ पुरविण्याच्या कामाकरिता सुधारित वाढीव खर्चाला व महानगरपालिका हद्दीतील जुने पनवेल शहर येथील जलशुद्धीकरण केंद्र व उच्चस्तरीय जलकुंभ तसेच देहरंग धरण व वितरण नेटवर्क परिचालनासाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या कामाकरिता वाढीव खर्चाचा विषय स्थायी समितीने स्थगित केला.