कर्जत : प्रतिनिधी
रमजान ईद व अक्षय्य तृतीया सणांच्या अनुषंगाने कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मस्जिदीचे अध्यक्ष तसेच मोहल्ला कमिटी व शांतता कमिटी सदस्यांची बैठक कर्जत पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत मस्जिदीचे अध्यक्ष सैदू शेख, कडाव मस्जिदीचे अध्यक्ष मस्जिद नारळेकर, पोटलवाडी मस्जिदीचे अध्यक्ष मन्सूर मालदार, सावेळे मस्जिदीचे अध्यक्ष फिरोज पटेल, जिल्हा शांतता समिती सदस्य रणजित जैन, भाजपचे नेते पुंडलिक पाटील, सुनिल गोगटे, दीपक बेहेरे, शिवसेनेचे भाई गायकर, मोहन ओसवाल, नदीम खान, नगरसेवक उमेश गायकवाड, बळवंत घुमरे, पोलीस मित्र प्रतिनिधी प्रिंतेश बोंबे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाउडस्पीकर, भोंगे याबाबत परवानगी अर्ज पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच आपआपल्या भागात शांततामय वातावरण राखणे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेणे, वाद होण्यासारखा प्रकार घड़त असेल तर त्याची पूर्व कल्पना पोलीस ठाण्यात कळविणे, व्हॉट्सअॅप तसेच फेसबुकवरून कोणताही जातीयवादी संदेश आल्यास तो कोठेही प्रसारित न करता त्याबाबत प्रथम पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, तसेच रमजान ईद व अक्षय्य तृतीया हे सण शांतता पूर्ण आनंदी वातावरणात साजरे करावेत. याबाबत पोलीस अधिकार्यांनी सूचना देवून मार्गदर्शन केले. सलोख्या विषयी पुंडलिक पाटील, नदीम खान, उमेश गायकवाड यांनी तर कर्जत शहरातील वाहतुकीविषयी रणजित जैन, दिपक बेहेरे यांनी आपली मते व्यक्त केली.