पनवेल ः वार्ताहर
मेडिएक्स ए मेंबर ऑफ मेडिएक्स ग्रुप या कंपनीची बनावट सही व लोगो तयार करून त्याद्वारे बनावट चेक करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रतिक विजय पाटणकर (रा. विचुंबे) आणि अमित सुभाष पाटील (रा. आवळीपाडा, अलिबाग) यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मेडिएक्स कंपनीत सौरव वेद हे चीफ ऑपरेटिंग ऑपरेटर म्हणून काम करतात. त्यांची कंपनी हॉस्पिटल डिझाइनिंगचे काम करते. 21 एप्रिल रोजी त्यांना तळोजा एमआयडिसी येथून अक्षय दोशी यांनी फोन करून, राजेश थळे नावाचा मॅनेजर कंपनीत आला असल्याचे सांगितले. याबाबत सौरव वेद यांनी चौकशी केली असता, कंपनीत राजेश थळे नावाचा कोणताही व्यक्ती आला नसून कंपनीने कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नसल्याचे मनीष कोठारी यांनी सौरव वेद यांना सांगितले. त्यांनतर पुन्हा 22 एप्रिल रोजी मनिष कोठारी यांनी सौरव वेद यांना, थळे नावाची व्यक्ती अक्षय दोशी यांना भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सौरव वेद हे तोंडरे गावातील कंपनीचे गोडाऊनमध्ये जाऊन अक्षय दोशी यांना भेटले व तेथेच थांबले. त्यानंतर अक्षय दोशी यांना भेटण्याकरीता तेथे दोन जण आले व राजेश थळे नावाच्या व्यक्तीने 55 लाख रुपयांचा एचडीएफसी बँकेचा मेडिएक्स या कंपनीचा बनावट सही केलेला चेक दिला. त्यानंतर अक्षय दोशी यांनी सौरव वेद यांना बोलावून घेतले व त्या दोघांची ओळख करून दिली मात्र त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. ते घाबरून पळून जात असताना अक्षय दोशी यांचे कंपनीतील कामगारांनी त्यांना पकडले. त्यांनी त्यांचे नाव प्रतीक विजय पाटणकर (रा. विचुंबे) व अमित सुभाष पाटील (रा. आवळीपाडा, अलिबाग) असे सांगितले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.