पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात 68 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला. तर 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 51 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 32 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 17 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 10 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी कामोठे 14, खारघर 18, कळंबोली सात, नवीन पनवेल सहा, पनवेल चार आणि तळोजामध्ये दोन रुग्ण सापडले आहेत. कळंबोली सेक्टर 15 मधील 44 वर्षीय व्यक्ती आणि सेक्टर 11 मधील 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
तसेच कळंबोलीत श्री स्वामी समर्थ सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती, कामोठेमध्ये सेक्टर 18 आणि सेक्टर 36 सिल्व्हर पार्कमधील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती, खारघरमध्ये सेक्टर 15 मधील एकाच कुटुंबातील चार व सेक्टर 7 एकाच कुटुंबातील तीन आणि वस्तूव्हीला मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती, नवीन पनवेलमध्ये सेक्टर 12 मधील न्यू कैलास सोसायटी, सेक्टर 14 आणि 6 मधील प्रत्येकी एक व्यक्ती, पनवेलमध्ये पायोनियर सोसायटी , बावन्न बंगला, साई नगर रोड आणि कच्ची मोहल्ला येथील प्रत्येकी एक व्यक्ती, तळोजा येथे तळोजा गाव आणि फेज 1 मधील व्यक्तींचा समावेश आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये नेवाळी येथील माऊली रेसिडेंसी मधील चार, चिपळे दोन महिला, उलवे 8 वर्षीय मुलगा, उसर्ली दोन, नेरे दोन, विचुंबे, पळस्पे, कोप्रोली, देवद, सुकापुर आणि बोनशेतमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे. तसेच विचुंबे तीन, वावंजे दोन, भोकरपाडा दोन, सुकापुर दोन, उलवे एक रुग्णाने कोरानावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
नवी मुंबईत तब्बल 202 रुग्णांची नोंद; नऊ जणांचा बळी
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत गुरुवारी (दि. 18) कोरोनाच्या 202 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर तब्बल एकाच दिवसात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईत रुग्णांची संख्या चार हजार 391 झाली आहे. नऊ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 138 झाली आहे.
गुरुवारी 62 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 519 झाली आहे. सध्या नवी मुंबईतील पालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत सद्यस्थितीत एक हजार 734 रुग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईतील कोरोनामुक्त होणार्यांची टक्केवारी 59 वरून 57 टक्क्यांवर घसरली आहे. गुरुवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 15, नेरुळ 16, वाशी 13, तुर्भे 19, कोपरखैरणे 33, घणसोली 37, ऐरोली 46, दिघा 23 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.
नेरळ येथील तरुण पॉझिटिव्ह
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील पोशिर गावातील कोरोना पॉझिटिव्ह तरुणाचा मृत्यू झाला असून त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या आणखी एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र हा तरुण नेरळ गावातील असून मृत तरुणाचे सोबत संबंधीत कंपनी मध्ये नोकरी करीत होता.
पोशिर गावातील 39 वर्षीय तरुण हा नवी मुंबईतील एका कंपनीत कामाला होता. तो तरुण पोशिर गावातून आपल्या बाईकने नेरळ येथे यायचा आणि आपली बाईक कंपनीमध्ये सोबत असलेल्या टेपआळी भागातील मित्रासह कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यापर्यंत सोबत चालत जात होते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हे दोघे नेरळ येथून कंपनी असा प्रवास सोबतच करीत होते. पोशिर येथील तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर उपचारासाठी दाखल होताच लागलीच दुसर्याच दिवशी त्या तरुणाचे निधन झाले होते.
त्यामुळे पोशिर येथील तरुणाच्या सोबत कामाच्या ठिकाणी जाणार्या नेरळ गावातील टेपआळी भागातील 48 वर्षीय तरुणाने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची टेस्ट करण्यासाठी स्वाब दिले होते. नेरळ टेपआळी येथील तरुणाच्या त्या टेस्टचे अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले असून नेरळ टेपआळी भागातील तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने नेरळ गावात पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
उरणमध्ये सात जणांना कोरोना
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण परिसरात बुधवारी आणखी कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले आहेत. चालू सप्ताहात तिसर्यांदा सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आजतागायत कोरोना रुग्णांची संख्या 197 पर्यंत पोहोचली आहे.
उरण शहरात बोरी येथील 37 वर्षीय पुरुष, देऊळवाडी येथील 40 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय महिला, कोटनाका येथील 34 वर्षीय पुरुष, गोवठणे येथील 51 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय महिला, पाणजे येथील 42 वर्षीय पुरुष व्यक्ती असे एकूण सात रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
उरण तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 197 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी आजपर्यंत 167 रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. उर्वरित 29 पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
नागोठण्यात आणखी एकाला लागण
नागोठणे : प्रतिनिधी – येथील रिलायन्स निवासीसंकुलात राहणार्या दोन कर्मचार्यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले असतानाच यातीलच एकाच्या मुलीचा रिपोर्ट सुध्दा पॉझिटिव्ह आला असल्याने निवासीसंकुलातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीनवर पोहोचली आहे.
निवासीसंकुल नागोठणे पोलीसठाणे आणि पेण तालुक्यातील गडब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असल्याने या दोन्ही ठिकाणी विचारले असता, त्यांचेकडून दुजोरा देण्यात आला. दरम्यान, गुरुवारपासून 28 दिवस निवासीसंकुलाचा हा परिसर कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडून घोषित करण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper