पनवेल : रामप्रहर वृत्त
ध्येय पूर्ण करण्यासाठी मोठे स्वप्न उराशी बाळगा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा, असा मोलाचा सल्ला पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मंगळवारी (दि. 26) विद्यार्थ्यांना दिला. ते जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात आयोजित पदवी प्रमाणपत्र सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होेते.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, रामशेठ ठाकूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. सी. मराठे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध विभागांचे प्रमुख मंचावर मान्यवरांसोबत उपस्थित होते.
या वेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी विद्यार्थ्यांचे कोरोना काळातही उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कौतुक केले. हा दिवस शिक्षक आणि पालक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असे ते म्हणाले. या संस्थेने विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याविषयीदेखील मार्गदर्शन दिले असल्याचे सांगत त्यांनी संस्थेचे कौतुक केले.
या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र तसेच विद्यावाचस्पती प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या शानदार सोहळ्यातत एनसीसीच्या पथकाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. सोहळ्याची सुरुवात सुरेल स्वागतगीताने झाली. त्यानंतर प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली तसेच त्यांनी आपल्या भाषणामध्ये महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला आणि सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्ष डॉ. एम. ए. म्हात्रे, परीक्षा नियंत्रक डॉ. एस. आय. उन्हाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव यांनी विशेष परिश्रम घेतले. सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर. व्ही. येवले, प्रा. डॉ. जी. एस. तन्वर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार परीक्षा नियंत्रक डॉ. एस. आय. उन्हाळे यांनी मानले.
सामान्य ज्ञानही महत्त्वाचे -लोकनेते रामशेठ ठाकूर
संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचेसुद्धा कौतुक केले. नुसते पुस्तकी ज्ञान महत्त्वाचे नसून या जगात वावरण्यासाठी सामान्य ज्ञानही महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …