Breaking News

लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवा!

पनवेल भाजपचे राज्य सरकारविरोधात कंदील आंदोलन

पनवेल : रामप्रहर
अघोषित लोडशेडिंग आणि वीजवसुलीच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून पनवेल भाजपकडून सोमवारी (दि. 25) सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रूचिता लोंढे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष के. सी. पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, संजय जैन, गोपीनाथ मुंढे, माधुरी कोडरू, अभिषेक भोपी, किशोर सुरते, केदार भगत यांच्यासह कार्यकर्ते आणि पनवेलकर सहभागी झाले होते. राज्य सरकारला शेतकर्‍यांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका या वेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविताना सांगितले की, गेल्या सुमारे तीन आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे. विजेची मागणी कमी असतानाच्या काळात करावयाची देखभाल-दुरुस्तीची कामे ऐन उन्हाळ्यात हाती घेऊन सरकारने वीजटंचाईच्या समस्येत भर घातली आहे.
सरकारी कार्यालयांची बिले थकविणारे व ग्राहकांची लुबाडणूक करणारे आघाडी सरकार हेच असून तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन वाढीव सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, असा इशारा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिला.
सरकारच्या बेशिस्तपणामुळे वीज मंडळाचा कारभार ढासळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना भारनियमनमुक्त असलेल्या महाराष्ट्रावर आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे उत्तर जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी केला.
जनतेवर अन्याय करणार्‍या महाविकास आघाडीचा निषेध -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विविध क्षेत्रांत आघाडी घेत आहे, पण जे जे भाजप करेल त्याच्या उलट करण्याचे ठरवल्यामुळे महाविकास आघाडी प्रत्येक पातळीवर अपयशी ठरतेय. कोळशाचा तुटवडा होत असताना बाकीची राज्ये उपाययोजना करीत होती. मग महाराष्ट्राला काय अवघड होते. विविध रिपोर्ट सांगताहेत की, या स्थितीमध्ये महाराष्ट्राला सर्वांत जास्त कोळसा देण्याचे काम केंद्राकडून झाले आहे, पण या महाविकास आघाडी सरकारला कृत्रिम टंचाई निर्माण करायची होती व त्या अनुषंगाने महागड्या दराने वीज खरेदी करायची होती, खिसे भरायचे होते आणि या उद्देशाने टंचाई होऊ दिली. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कुठे घोषित, तर कुठे अघोषित भारनियमन सुरू आहे. महागड्या दराने वीज खरेदी करून त्याची वाढीव दराने ग्राहकांना बिले देण्यात येत आहे. त्यामुळे जनता प्रचंड संतापली आहे. या जनतेच्या वतीने हे कंदील आंदोलन केले आहे. वीज ग्राहक हा वीज वितरणचा कायमचा ग्राहक आहे आणि त्याला स्पर्धा नाही आहे की तो दुसर्‍याकडून वीज खरेदी करेल. अशा स्थितीत सुरक्षा अनामत रक्कम घेणे अन्यायकारक आहे. त्यामुळे त्याचा, भारनियमनाचा आणि महाविकास आघाडीचा आम्ही निषेध करतो.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply