Breaking News

कंत्राटी कामगारांची पगाराविना उपासमार

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार; प्रशासनाविरोधात नाराजी

कर्जत ः बातमीदार

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्‍या आहार विभागातील सफाई कामगारांना आरोग्य विभागाने मागील पाच महिन्यांपासून पगार दिला नाही. कंत्राटी पद्धतीने काम करणारे हे कामगार कोरोना काळातही न थकता काम करीत आहेत. दरम्यान, या सर्व कामगारांना दिवाळीतही सानुग्रह अनुदान किंवा थकीत पगार दिले गेले नाहीत. परिणामी कंत्राटी कामगारांची पगाराअभावी उपासमार सुरू आहे. 

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी कामगार म्हणून सेवेत असलेले 17 कर्मचारी अनेक वर्षे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेत आहेत. हे कंत्राटी कर्मचारी आहार विभागात नियुक्तीवर असूनही त्यांना पडेल ते काम कर्जत उपजिल्हा रुग्णालयात करावे लागते. सफाई कामगार, वाहनचालक, सुरक्षा रक्षक म्हणून कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. मार्चपासून कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यानंतर खासगी दवाखाने बंद असल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण जात होते. सर्वाधिक लोक कोरोना टेस्ट व अन्य आजारावर उपचारासाठी येत असतानाही कर्जत उपजिल्हा रुग्णालयामधील कंत्राटी कामगार काम करीत आहेत. अशा कामगारांना शासनाच्या आरोग्य विभागाने वार्‍यावर सोडले आहे. जून 2020पासून या कामगारांना शासनाने पगार दिला नाही. आधीच लॉकडाऊन व त्यात दिवसभर काम करूनही पगार मिळाला नसल्याने कामगार नैराश्यात आहेत. नोव्हेंबर महिना संपत आला तरी कंत्राटी कामगारांना आरोग्य विभागाने पगार दिला नाही.

आरोग्य विभाग सेवेतील कंत्राटी कर्मचार्‍यांचे पगार कर्जत उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्‍या लेखनिकांनी बनवून अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवून दिल्यावर होतात, मात्र कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील लेखनिक कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या सल्ल्याने काम करीत असून यापूर्वीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी सप्टेंबर 2020पर्यंत म्हणजे चार महिन्यांचे पगार थकीत ठेवले होते. पत्रकार संतोष पवार मृत्यूप्रकरणी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बनसोडे यांच्याकडून कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचा पदभार काढून घेतला होता. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव धनगावे यांच्याकडे कंत्राटी कामगारांनी थकीत पगाराची मागणी केली, मात्र त्यांनी टोलवाटोलवी केली असून वैद्यकीय अधीक्षकांच्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयामधील कंत्राटी कामगारांचे पगार मागील सहा महिन्यांपासून झाले नाहीत.

दरम्यान, पगाराअभावी कंत्राटी कामगारांच्या घरी दिवाळीही साजरी झाली नाही. त्यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालय व तेथील कोविड सेंटरमध्ये सेवा देणारे सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक, आहार विभागातील कर्मचार्‍यांच्या कुटुंबात शासनाविरोधात नाराजी पसरली आहे. आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या कंत्राटी कामगारांना नैराश्याने ग्रासले असून त्यांनी आपल्या जीवाचे बरे वाईट केले तर त्यास रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील, असे रुग्णालय अधीक्षकांना कळविण्यात आले आहे.

कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार आपल्याकडून 100 टक्के सेवा देत आहेत. त्यामुळे आपल्याकडे हा विषय आल्यानंतर तत्काळ उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा केला असून संबंधित लेखनिक रजेवर आहेत. ते कामावर रूजू झाल्यावर कंत्राटी कामगारांचे पगार देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

-डॉ. संजीव धनगावे, वैद्यकीय अधीक्षक, कर्जत उपजिल्हा रुग्णालय

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply