ढाका : वृत्तसंस्था
पगारवाढीसह अन्य काही मागण्यांची पूर्तता होत नाही, तोवर कोणत्याही क्रिकेट सामन्यात खेळणार नसल्याची भूमिका खेळाडूंनी घेतल्यामुळे बांगलादेशचा भारत दौरा अडचणीत सापडला आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सावध भूमिका घेतली आहे.
शाकिब अल हसन (कसोटी व ट्वेन्टी-20 कर्णधार), महमदुल्ला, मुशफिकर रहिम या बांगलादेशच्या प्रमुख खेळाडूंनी पत्रकार परिषद घेऊन क्रिकेट सामन्यांवरील बहिष्काराचा निर्णय जाहीर केला. या वेळी सुमारे 50 खेळाडू सहभागी झाले होते. या घटनेमुळे बांगलादेशमधील राष्ट्रीय क्रिकेट लीगवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारताचा बांगलादेश दौरा 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, यात तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका आणि जागतिक अजिंक्यपदाचे दोन कसोटी सामने यांचा
समावेश आहे. दरम्यान, आम्ही बांगलादेशमधील घटनांचा आढावा घेत आहोत. बांगलादेश क्रिकेट मंडळाची ही अंतर्गत बाब आहे. त्यामुळे दौर्याबाबत अधिकृत माहिती मिळत नाही, तोवर आम्ही कोणतेही मत प्रदर्शित करणार नाही, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
…तर भारताला 120 गुणांचा बोनस
जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा भाग असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेत दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. बांगलादेशने दौरा न केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) भारताला कसोटी मालिकेतील विजयाचे 120 गुण बहाल करेल.