Breaking News

पनवेल परिसरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

नियमांच्या उल्लंघनाविरोधात वाहतूक विभागाची मोहीम

पनवेल : वार्ताहर

दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणार्‍या वाहनचालकांवर पनवेल शहर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरातील ठाणा नाका, शिवशंभो नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उरण नाका, पंचरत्न सर्कल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, एसटी स्टँड परिसर, नवीन पनवेल आदी ठिकाणी वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारीवर्गाकडून विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या सूचनेनुसार पनवेल शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या नेतृत्वाखाली वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या तसेच विशेषतः विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍या वाहनचालकांच्या लायसन्स निलंबनाची कारवाई केली जात आहेत. सध्या ‘ई चलन’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले आहेत, काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहेत, परंतु अजूनही काही वाहनचालक नियमांना बगल देत स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात आणत आहेत. गेल्या तीन महिन्याच्या दरम्यान पनवेल शहर वाहतूक विभागाच्या वतीने विना हेल्मेट दुचाकी चालवणार्‍या एकूण 5296 दुचाकीस्वारांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 133 लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. यातील 77 लायसन्स आरटीओकडे पाठवले असून अद्याप 56 लायसन्सधारक दंडाची रक्कम भरण्यास न आल्याने ते शिल्लक ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दुचाकींची संख्या वाढली आहे. दुचाकींची संख्या वाढण्यासोबतच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच स्पीड बाईक्स, स्पोर्ट्स बाईक, मॉडीफाईड बाईक्सचे ठराविक तरूणवर्गात वेड आहे. त्यामुळे काही दुचाकीस्वार भरधाव वेगाने दुचाकी चालवत असतात. त्यामुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग ओढवतात. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. बहुतांश दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणारे वा निधन पावणारे वाहनचालक हे हेल्मेट शिवाय प्रवास करणारे असतात. त्याचबरोबर दुचाकींचे सर्वाधिक अपघात हे अंतर्गत रस्त्यांवर झाले आहेत. तसेच हेल्मेट परिधान केल्यामुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटल्याचे वारंवार समोर आले आहे. हेल्मेट वापरणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

विनाहेल्मेट वाहन चालवणे हे कायद्याच्या दृष्टीने अयोग्यच आहे. त्याप्रमाणेच स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. एखाद्या वेळेस अपघाताच्या परिस्थितीत हेल्मेट प्राण वाचवू शकते. त्यातच आरटीओच्या दंडातही भरमसाठ वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना हे दंड परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासोबतच दुचाकी चालवताना हेल्मेट वापरून स्वतःच्या जिवाचीही सुरक्षितता बाळगावी. वाहतुकीच्या नियमांचे भान राखावे.

-संजय नाळे, पोली निरीक्षक वाहतूक विभाग, पनवेल शहर

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply