Breaking News

मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात

महिला आयोगाच्या अध्यक्षांचे विधान

रायपूर ः वृत्तसंस्था
मुली, महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्काराच्या तक्रारी करतात, असे बेधडक
वक्तव्य छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष किरणमयी नायक यांनी केले आहे.
छत्तीसगढमधील बिलासपूर येथे माध्यमांशी बोलत असताना किरणमयी नायक म्हणाल्या, जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल, तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवे की ती व्यक्ती जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही, पण जेव्हा असे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला या पोलीस ठाण्यात धाव घेतात.
अल्पवयीन असणार्‍या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचे कुटुंब, मित्र आणि स्वत:चे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. बहुतांश घटना अशा आहेत की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली नाते तुटल्यानंतर बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी महिला, मुलींना आवाहन करते की, त्यांनी आधी नाते समजून घ्यावे. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, तर त्याचा परिणाम वाईटच होईल, असे नायक यांनी म्हटले.
जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला व पुरुषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे, असेही नायक यांनी स्पष्ट केले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply