पाणीटंचाई कर्मचार्यांची वानवा दूरध्वनी सेवा बंद
महाड : महेश शिंदे
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक पाचाड गावातील रायगड जिल्हा परिषदेचे जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य सेविका, पाणी, दूरध्वनी संपर्क अशा अनेक समस्यांना येथील कर्मचार्यांना सामोरे जावे लागत आहे.
ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे रायगड जिल्हा परिषदेचे जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. महाड तालुक्यातील पाचाड, रायगडवाडी, नेवाळी, हिरकणी वाडी, पुनाडे, सांडोशी, सावरट, कोंझर, कोथुर्डे, वाळसुरे, छत्री निजामपूर आदी गावातील ग्रामस्थांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचा फायदा घेता येतो. तसेच महाड शहरालगत असलेल्या लाडवली गावापर्यंत या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र आहे. ऐतिहासिक किल्ले रायगडावर येणार्या शिवप्रेमींनादेखील याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे लागतात.
या परिसरात खाजगी दवाखाने नसल्याने गरोदर महिलांना प्रसूतीसाठी याच प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वारंवार मागणी होऊनदेखील त्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन दखल घेत नाही. यामुळे स्थानिक रुग्णांना पदरमोड करून महाड शहरात उपचारासाठी यावे लागते.
जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असले तरी या ठिकाणी महिला परिचारिका नसल्याने उपकेंद्रातील महिला कर्मचार्यांना काम करावे लागत आहे. रात्री अपरात्री याठिकाणी प्रसूतीसाठी महिला रुग्ण दाखल झाल्यास या महिला कर्मचार्यांना बोलावले जाते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, औषध निर्माता, सफाई कामगार अशी पदे रिक्त असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बिरादार यांनी सांगितले. तर पाचाडमध्ये पाणीटंचाई असल्याने या ठिकाणी आठ दिवसातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे.
यामुळे आरोग्य केंद्रात पाणी फारच जपून वापरावे लागते आहे. पाचाडमध्ये मोबाईल आणि लँडलाईन दूरध्वनी असून नसल्यासारखे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधने कठीण जात आहे. रायगड जिल्हा परिषद या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी समस्या बिकट आहे. यामुळे रुग्णांच्या उपचारात अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणची दूरध्वनी सेवादेखील खंडित आहे. प्रसूतिगृह असले तरी पाणीटंचाई आणि सोनोग्राफीसारखी यंत्रणा नसल्याने परिसरातील रुग्णांना अन्य ठिकाणी जावे लागते.
-डॉ. सफाना कादरी, वैद्यकीय अधिकारी, पाचाड