Breaking News

पनवेल महानगरपालिकेचा करवाढविरहीत अर्थसंकल्प मंजूर

नामावलीवरून विरोधकांचा चर्चा न करता सभात्याग

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेचा आर्थिक वर्ष सन 2021-22चा सुधारित व सन 2022-23चा कोणतीही करवाढ नसलेला मूळ अर्थसंकल्प नगरसेवक हरेश केणी व अमर पाटील यांच्या सूचनांसह गुरुवारी मंजूर करण्यात आला, मात्र अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या बाबींवर चर्चा करण्याऐवजी केवळ त्या त्या पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांचे आपल्या भाषणात नाव न घेतल्यामुळे विरोधकांनी
गदारोळ करून सभात्याग केला. त्यामुळे पनवेलकरांच्या सोयीसुविधा महत्त्वाच्या की, नेत्यांची नावे घेण्याचा केवळ उपचार महत्त्वाचा, हाच प्रश्न पालिकेत चर्चिला
जात होता. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष सन 2021-22 चे सुधारित व सन 2022-23 चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी गुरुवारी (दि. 5) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व सदस्य उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांनी अंदाजपत्रकाची प्रत महापौरांना सादर केल्यावर मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेतले नाही म्हणून राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांनी हरकत घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्यावर शेकापचे विधानपरिषद सदस्य बाळाराम पाटील यांचे नाव घेतले नाही असे सांगत शेकापच्या सदस्यांनी हरकत घेतली. या वेळी नरेश ठाकूर यांचे मनोगत सुरू असताना विरोधकांनी महापौरांसमोर जाऊन गदारोळ केला, तर विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी चक्क नरेश ठाकूर यांच्यासमोरील माईक बंद करून संविधानिक नियमाला हरताळ फासला.
महापौरांनी, नरेश ठाकूर हे त्यांचे मनोगत व्यक्त करीत आहेत ते झाल्यावर तुम्ही बोला, असे सांगूनही विरोधकांनी आमदार बळाराम पाटील यांचे नाव घेण्याचा हट्ट सुरूच ठेवून सभात्याग केला. विरोधी पक्षाच्या हरेश केणी, बबन मुकादम व दोन महिला सदस्यांसह एकूण पाच सदस्यांनी सभात्याग केला नाही. त्यानंतर हरेश केणी व अमर पाटील यांच्या सूचनांसह अंदाजपत्रक मंजूर करण्याची सूचना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मांडली. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी आर्थिक वर्ष सन 2021-22चे सुधारित व सन 2022-23चे मूळ अंदाजपत्रक मंजूर झाल्याचे जाहीर केले.

खर्‍या अर्थाने अर्थसंकल्प हा महासभेपुढे येतो तो त्यावर चर्चा करण्यासाठी त्यातील खर्चाच्या आणि जमा बाजूवर चर्चा करण्यासाठी येतो, पण त्याऐवजी विरोधकांनी कोणाचे नाव घेतले, कोणाचे नाही यासाठी सभात्याग केला हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही आर्थिक बाबींवर त्यांनी आपले मत मांडलेले नाही. विरोधकांनी सभात्याग केला असेल तर आपण काही करू शकत नाही.
– डॉ. कविता चौतमोल, महापौर

विरोधकांना बजेटवर चर्चा करायची असती तर ते अर्धा तास आधी आले असते. त्यांना त्यावर काही मत व्यक्त करायचे नव्हते फक्त अडथळाच आणायचा होता. बजेट हा सभात्यागाचा विषय नसतो. त्यामध्ये असलेल्या तरतुदींवर चर्चा करायची असते, सूचना करायच्या असतात. त्या त्यांना करायच्या नसल्याने काही तरी निमित्त करून त्यांनी सभात्याग केला आहे. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सुविधांचा वापर करून नागरिकांचा विकास व्हावा यासाठी मांडलेले बजेट मंजूर करावे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply