खालापूर : अरुण नलावडे
खालापुर तालुक्यातील 11 गावे आणि 27 आदिवासीवाडयातील नागरिकांचा घसा तहानेने कोरडा पडला आहे. तालुक्यात बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी तसेच चार मोठी धरणे, चार बंधारे व पाझर तलाव आहेत. त्यात मुबलक पाणी असताना तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
खालापूरातून पातळगंगा ही बारमाही वाहणारी नदी आणि डोनवत, कलोते, भिलवले व मोरबे ही मोठी धरणे आहेत. त्यापैकी मोरबे धरण हे नवी मुंबईसाठी राखीव असून, कलोते, भिलवले आणि डोणवत या धरणातून स्थनिकांना पाणीपुरवठा केला जातो. रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीचे बाठी सांगाडे, आत्कारगाव, धामणी, उसरोली बाधवाडी हे लघुपाटबंधारे प्रकल्प खालापुरातच आहेत. परंतु अनेक कारखाने तसेच अॅडलॅब इमाजीका यांच्याकडून पाण्याचा मोठा उपसा होत असल्याने, स्थानिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. आदिवासी वाड्यांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
यंदाच्या उन्हाळ्यात होराळे, परखंडे, झाडणी, गारमाळ, खरसुंडी, गोहे, चिलठण, हाळ खुर्द, वणी, खाने आंबिवली आदी गावे आणि कुंभिवली कातकरवाडी, रानसई आदीवासीवाडी, खरसुंडीवाडी, निंबोडावाडी, वावोशीवाडी, कोपरीवाडी आदी 27 आदिवासी वाड्यांना तीव्र पाणीटचाईचा सामना करावा लागत आहे.
खालापूर तालुक्यात 2016-17मध्ये 10गावे व 27 वाड्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 28लाखाचा निधी खर्ची घातला गेला. 2017-18 मध्ये टंचाईग्रस्त गावांची संंख्या 7वर आली होती. तर यंदाच्या उन्हाळ्यात खालापूर तालुक्यातील 44 वाड्या व गावांना पाणी टंचाई भासेल, असे गृहित धरून पाणी पुरवठा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात टँकरने पाणीपुरविण्यासाठी सहा लाख 50 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय 4 ग्रामपंचायतींना नळपाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच 8 गावे आणि 11 वाड्यांत नवीन इंधन विहिरी घेणे, जलयुक्त शिवार, विहिरी -गाव तळ्यांची सफाई यासाठी मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
खालापूर गावाशेजारून बारमाही वाहणारी पातळगंगा नदी जाते. काही कंपन्या रासायनिक सांडपाणी नदीत सोडत असल्याने पाताळगंगा प्रदूषित झाली आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही. तर कलोते धरणातून ‘अॅडलॅब‘ वाटर पार्कला मनोरंजनासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र स्थानिक ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश गावंड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खालापूरात काही गावे व आदिवासीवाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून, मागणी आल्यानंतर तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.
-संजय भोळे, गटविकास अधिकारी, खालापूर