Breaking News

टंचाईग्रस्त गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवा ; उपविभागीय आधिकार्यांचे लघु पाटबंधारे विभागाला निर्देश

म्हसळा : प्रतिनिधी

लघु पाटबंधारे विभागाने पाभरे धरणाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने काही गावांत टंचाई सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. कामादरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करून लघु पाटबंधारे विभागाने संबंधीत गावांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, असे निर्देश उपविभागीय आधिकारी प्रविण पवार यांनी दिले दिले आहेत.

ऐन उन्हाळ्यात लघु पाटबंधारे विभागामार्फत पाभरे धरणाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी धरणातील बहुतांश पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पाभरे धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजनेवर पडला आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या 10 गावे आणि 4 वाड्यांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी उपविभागीय आधिकारी प्रविण पवार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधीतांची बैठक घेण्यात आली. तहसीलदार शरद गोसावी, गटविकास अधिकारी प्रभे, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता गांगुर्डे, लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता एस. एस. शिंदे, आर. व्ही. चितळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष मनोज नाक्ती, सचिव सखाराम पवार, सरपंच महादेव भिकू पाटील, उपसरपंच जनार्दन गाणेकर, अंकुश गाणेकर, धोंडीबाई चाळके, वनिता खोत, अनिल बसवत, महादेव म्हात्रे, शेखर खोत, रियाज फकीह, नथुराम खोत आदी पदाधिकारी व ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. याबैठकीत उपविभागीय आधिकारी पवार टंचाई सदृश्य परिस्थीती निर्माण झालेल्या गावांचा पाणी पुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, अशा सूचना लघु पाटबंधारे विभागाला दिल्या.

-पाणी टंचाई निर्माण झालेली गावे व वाड्या

पाटबंधारे विभागाने पाभरे धरणाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने कांदळवाडा, निगडी, तोंडसुरे, सकलप खारगाव खुर्द, रेवली, बनोटी, गणेशनगर, वरवठणे, आगरवाडा, पेडांंबे ही गावे आणि जंगमवाडी, तोंडसुरे बौद्धवाडी, वरवठणे कोंड, आगरवाडा बौद्धवाडी या वाडयाना पाणी टंचाईची झळ पोहचत आहे.

पाभरे धरण गळती व दुरुस्ती करण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी टेंडर कॉल करूनही ठेकेदार न आल्याने टेंडरची कार्यवाही थांबली आहे. महसुल विभागाकडून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आचार संहितेचे शिथीलीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

-एस. एस. शिंदे, स. अभियंता,

पाटबंधारे विभाग – कोलाड.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply