किल्ल्याचा चढ-उतार सुलभ होण्यासाठी मागणी
मुरूड : प्रतिनिधी
मुरूड राजपुरी येथे असणारा जंजिरा किल्ला हा संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असा किल्ला आहे. दरवर्षी हा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागामधून लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. 13 शिडाच्या होड्या तर दोन मशीन बोटीद्वारे या किल्ल्यावर पर्यटकांना पोहचवण्याचे काम केले जाते. किल्ल्यावर पर्यटकांना सहज उतरता यावे यासाठी जंजिरा किल्ल्यावर जेट्टी असणे खूप आवश्यक आहे.
किल्ल्याच्या चहू बाजूला समुद्र व त्यामध्ये दोन गोड्या पाण्याची तलावे हे या किल्ल्याचे वैशिष्ठ आहे. सुमारे 22 एकरचा परिसर व 22 बुरुज असलेला किल्ला साडेतीनशे वर्ष होऊन सुद्धा किल्ला आहे तसाच आहे. त्यामुळे हा जलदुर्ग पाहण्यासाठी विदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात. किल्ल्यावर जेट्टी असणे आवश्यक आहे, कारण ज्यावेळी समुद्राला भरती असते अश्यावेळी किल्ल्याच्या दरवाजापाशी पर्यटकांना घेऊन ज्या होड्या थांबतात त्या होड्या समुद्राच्या पाण्यात हेलकावे घेतल्यामुळे किल्ल्यावर उतरणे खूप कठीण बाब होऊन बसते. विशेष करून महिलांना उतरताना मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणी जेट्टीची खूप आवश्यकता असताना सुद्धा पुरातत्व खाते दुर्लक्ष करीत असल्याने या ठिकाणी जेट्टीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. गृह विभागाने 6 एप्रिल 2022 खोरा बंदर येथे असणार्या प्रवासी जेट्टी ची उंची व लांबी वाढवण्यासाठी अकरा कोटी सवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ओहटीच्या वेळी खोरा बंदरात प्रवासी वाहतूक करणे अडचणीचे होत असल्याने सदरील कामास तातडीने निधी मंजूर झाला परंतु जंजिरा किल्ल्यावर जेट्टी होण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न होत नसल्याने हे काम गेले अनेक वर्ष रखडले आहे. पुरातत्व खात्याने मागे या किल्ल्याचा सर्व्हे केला असता या किल्ल्याच्या पुढील बाजूस जेट्टी अशक्य असल्याचे मत नोंदवण्यात आले होते. कारण किल्ल्याच्या दर्शनी भागावर लाटांचा प्रवाह जास्त असल्याने हे काम अश्यक्य होते. त्यानंतर किल्याच्या पाठीमागील बाजूचा सर्व्हे केला गेला त्यावेळी पाठीमागील बाजूस जेट्टी शक्य असल्याचे मत नोंदवण्यात आले, परंतु या गोष्टींना अनेक वर्षे होऊनसुद्धा जेट्टीचे काम काही मार्गी लागलेले नाही. त्यामुळे प्रवासी वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या जेट्टीसाठी प्रत्यक्ष निधी मिळणे खूप आवश्यक असून त्या हेतूने पावले उचलणे खूप आवश्यक आहे. जंजिरा किल्ल्यामुळे राज्य शासनास प्रत्येक प्रवासी मागे लेवी रूपाने कर आकारला जातो. तर किल्ला पहावयास येणार्या प्रत्येक पर्यटकांकडून पुरातत्व खाते 60 रुपये तिकीट आकारते. शासनास या किल्ल्यापासून दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळत असतो. पुरातन वास्तू टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक असताना येथे मात्र दुर्लक्ष होते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या किल्ल्यावर पर्यटकांना अगदी सुलभ पणे चढ उतार करण्यासाठी जेट्टीची खूप आवश्यकता असताना त्याची पूर्तता होताना मात्र दिसत नाही.
…तर मोठा निधी प्राप्त होऊ शकेल
जंजिरा किल्ल्यावर जेट्टी खूप आवश्यक असून हे काम फक्त सागरमाला योजनेतूनच शक्य होणार आहे. कारण भर समुद्रात जेट्टी बांधण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून याबाबतचा प्रस्ताव बनवून त्यास राज्य शासनची मान्यता घेऊन केंद्राकडे पाठवल्यास मोठा निधी प्राप्त होऊ शकणार आहे.