माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावच्या फाट्यावर असणारा गोद नदीवरील पूल दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याने पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळे या महामार्गावरून जाणारे वाहनांना धोका होण्याचा संभव आहे.
दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीत हा पूल कमकुवत असल्याने शासनाकडून महामार्गावरील वाहतूक बंद केली जाते. ही वाहतूक रत्नागिरी, महाड, माणगाव बाजू कडून मुंबईकडे जाणार्या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून निजामपूर मार्गे वाहतूक सुरू ठेवली जाते. या ही मार्गावर कांदळगाव येथील नदीच्या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते. त्यामुळे हा मार्गही अनेक वेळा बंद ठेवला जातो. पावसाळाजवळ आल्याने या पुलाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने उपाययोजना आखणे गरजेचे होते. महाड सावित्री नदी येथील दुर्घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच या नदीवरील पूल नव्याने उभारण्याकडे शासनांनी दुर्लक्ष चालवले आहे. हा नवीन पूल कधी उभारणार असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावपासून अवघ्या 2 कि.मी अंतरावर कळमजे गावच्या फाट्यावर गोद नदी असून या नदीवर ब्रिटीशकालीन पूल बांधण्यात आला होता. या पुलाचे बांधकाम पूर्ण दगडात असून हा पूल दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीत या नदीला मोठा पूर येतो त्या वेळी शासन या पुलावरून येणे जाण्यासाठी वाहतूक बंद करते. हा पूल धोकादायक असल्याने विशेषतः पावसाळ्यात कोसळण्याची दाट शक्यता आहे. या पुलाची उंची कमी असून पावसाळ्यात या पुलाला पाणी लागते. या नदीवर शासनाने प्रवासी, वाहनचालकांना सावधगिरीच्या उपाययोजना म्हणून दोन्ही बाजूंनी स्ट्रीट लाईट बसवणे तसेच सूचना फलक लावणे गरजेचे आहे. ते बसवले नसल्याने पावसाळ्यात वाहनांना धोका होण्याचा संभव आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे नदीवरील पुलाची दुरुस्ती वेळोवेळी लिक्विड टाकून केली आहे. यंदा हा नवीन पूल बांधण्यासाठी शासनांनी मंजूर केला असून या पुलाच्या बांधकामाचे टेंडरही निघाले असून या पुलाचे काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहे. तसेच या पुलाची लांबी 35 मीटर तर रुंदी 16 मीटर असून उंचीही वाढवली जाणार आहे. यासाठी सहा कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. -श्री. माडकर, कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग