कर्जत : बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचा 9 सप्टेंबर रोजी आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य शासनाने मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्वांवर कारवाई होईल, असे जाहीर केले होते, मात्र 20 दिवसांत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पत्रकार आक्रमक झाले. ते पाहून अखेर या प्रकरणाला गती मिळाली असून, कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्हाधिकार्यांनी नेमलेली चौकशी समिती संतोष पवार यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पोहोचली आहे.
पत्रकार संतोष पवार यांना 9 सप्टेंबर रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नेरळ येथून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना तेथून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून नवी मुंबईतील रुग्णालयात नेले जात होते. वाटेत पवार यांना ऑक्सिजन पुरवठा करणार्या सिलिंडरमधील ऑक्सिजन संपल्याने रुग्णवाहिकेतील महिला डॉक्टरला सिलिंडर बदलता आला नाही. परिणामी ऑक्सिजनअभावी पवार यांचे निधन झाले होते.
रायगडच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर राज्य शासन तत्काळ कारवाई करेल असे जाहीर केले होते. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी चारसदस्यीय समिती नेमून चौकशी करण्याचे आणि चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते, मात्र पवार यांच्या मृत्यूप्रकरणी आजतागायत शासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
समितीच्या सदस्य पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचिता गवळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजेकर, सर्व्हिस अभियंता गणेश कांबळे, रुग्णवाहिका समन्वयक संतोष काळे यांनी या कालावधीत कर्जत उपजिल्हा रुग्णालय, अधीक्षक, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे चालक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासह पवार यांच्यावर 8 सप्टेंबर रोजी तपासणी करून औषधोपचार करणार्या नेरळमधील खासगी डॉक्टरांची चौकशी केली होती, तर पुत्र मल्हार यांनी आपले म्हणणे 10 सप्टेंबर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दिले होते, मात्र कारवाई होत नसल्याने कर्जतमधील पत्रकारांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, रायगडच्या पालकमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना 13 सप्टेंबर रोजी पत्राद्वारे संतोष पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
तरीदेखील कोणही कारवाई पवार यांच्या मृत्यूनंतर 18 दिवस लोटले तरी झाली नाही.त्यामुळे कर्जत येथे आरोग्य आणि कोविडचा आढावा घेण्यासाठी आलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या आढावा बैठकीत अनेक प्रश्न संतोष पेरणे, बाळा गुरव, प्रसाद अटक यांनी उपस्थित केले. पत्रकार आक्रमक झाल्यानंतर अखेर 30 सप्टेंबर रोजी रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधीर माने यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. तेथील अन्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय धनेगावकर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
अन्यथा पत्रकारांचे साखळी उपोषण
रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समितीदेखील 30 सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यात पोहोचली. त्यांनी पवार यांच्या नेरळ येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी चौकशी समितीने या मृत्यूप्रकरणी म्हणणे मांडण्याची सूचना केली. त्यानुसार संतोष पवार यांचे पुत्र मल्हार यांनी प्रत्यक्ष घडलेली घटना सविस्तर स्वरूपात चौकशी समितीपुढे सादर केली. त्या वेळी तेथे उपस्थित पत्रकारांनी चौकशी समितीने 5 ऑक्टोबरपूर्वी संबंधित मृत्यूप्रकरणी कारवाई न केल्यास पत्रकार साखळी उपोषण करणार आहेत, असे स्पष्ट केेले.