सात बोगस कर्ज खाती; मनमानी कारभाराचा नमुना
पनवेल : रामप्रहर वृत्त
शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांनी केवळ ६३ बोगस कर्जखातीच नाहीत तर आणखी सात बोगस कर्जखात्यांतील कोट्यवधींवर डल्ला मारल्याचे कर्नाळा बँकेचे प्रभारी सीईओ प्रवीण रामभाऊ म्हात्रे यांनी ईडीला दिलेल्या जबाबातून पुढे आले आहे. ६३ बोगस कर्जखात्यातील ५२९ कोटी १४ लाख ९१ हजार १४२ रुपये आणि आणखी सात बोगस कर्जखात्यातील ४७ कोटी २३ लाख ९४ हजार ११४ रूपयांचा घोटाळाही विवेकांनद शंकर पाटील यांनीच केला असल्याचे म्हात्रे यांच्या जबाबात स्पष्ट म्हटले आहे.
प्रवीण रामभाऊ म्हात्रे हे सध्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विवेकानंद पाटील यांनी ६३ बोगस कर्जखात्याव्यतिरिक्त आणखी घोटाळ्यांची माहिती घेण्यासाठी २२ जून २०२१ रोजी ईडीने जबाब घेतला. यातून ही बाब उघड झाली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अक्ट २००२ म्हणजेच अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा २००२ या कायद्यातील तरतुदींनुसार हा जबाब नोंदविण्यात आला.
ईडीने हा जबाब घेताना प्रभारी सीईओ म्हणून काम करताना आपल्याला कोणते गैरव्यवहार वा घोटाळे आढळले, असा प्रश्न विचारला असता म्हात्रे यांनी सांगितले की, विवेकानंद पाटील यांच्या सूचनेनुसार बँकेचे सीईओ हेमंत मुरलीधर सुताने आणि कर्ज विभागातील इतर अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या व्यक्ती, संस्थांच्या नावाने ६३ बोगस कर्जखाती उघडली तसेच या ६३ बोगस खात्यांशिवाय विवेकानंद शंकर पाटील यांनी वापरलेली इतर खातीही आढळून आली.
बोगस ६३ खात्यांशिवाय आढळलेली आणखी सात खाती पुढीलप्रमाणे आहेत. कुरेशुद्दीन एस. सिद्दिकी (आठ कोटी, ३५ लाख, ९५ हजार, ६६६ रू.), जीवन पांडुरंग गावंड (सात कोटी, २४ लाख ७५ हजार, ८७१ रू. ८० पैसे), रमेश एंटरप्राईजेस (नऊ कोटी, ३९ लाख ३४ हजार ४८८ रु. ९९ पैसे), विशाल एंटरप्राईजेस (सहा कोटी, सहा लाख ९० हजार, ५८ रू. ८० पैसे), सार्थक एंटरप्राईजेस ( चार कोटी २५ लाख, २९ हजार, ५९ रू.), सार्थक असोसिएटस (चार कोटी, ७० लाख १२ हजार, ३३३रू. ५९ पैसे) आणि कर्नाळा महिला रेडिमेड गारमेंट ( सात कोटी, २१ लाख ५६ हजार, ६३६ रू. सात पैसे) या संपूर्ण सात खात्यांमध्ये ४७ कोटी, २३ लाख, ९४ हजार, ११४ रूपये ८५ पैसे आहेत.
आतापर्यंत ६३ बोगस कर्जखाती आणि आणखी सात बोगस कर्जखात्यांचे व्यवहार हे विवेकानंद शंकर पाटील यांच्याशी संबंधित कंपन्या, संस्था, व्यक्ती यांच्या कर्नाळा र बँकेतील खात्यांमध्येच झाले असल्याचे म्हात्रे यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. ज्या खात्यांमध्ये हे व्यवहार झाले ती खाती पुढीलप्रमाणे : कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमी (सीए ११८२), कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट (सीए २४२५), शंकर पार्वती इन्फ्रावर्ल्ड प्रा. लि. (सीए २४५७), कर्नाळा महिला रेडिमेड ग गारमेंटस (ओडी २५२), विवेक ऑटोमोबाईल्स र (सीए १), दैनिक कर्नाळा पेपर (सीए २७५४), रायगड श्रमिक एकता संघ (एसबी ३८१५), आर. पी. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (सीए चे ३२१२), कर्नाळा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (सीए : २७१३), आस्वाद पेट्रोलियम (सीए ९८६), 7 कर्नाळा कुक्कुटपालन (सीसी १०१), सार्थक ↑ एंटरप्राईजेस (ओडी २०१) आणि सार्थक असोसिएट्स (ओडी २०३).
६३ बोगस कर्ज खात्यांसह वरील सातही कर्ज खाती ही विवेकानंद शंकर पाटील यांच्या सूचनेवरूनच उघडण्यात आली आहेत तसेच ही खाती उघडताना खोटी कागदपत्रे, केवायसीसाठी खोटी कागदपत्रे वापरण्यात आली. कोणतेही तारण वा सुरक्षित यंत्रणाही ही खाती उघडताना वापरण्यात आले नाही. या खात्यांतील पैशांचा वापर विवेकानंद शंकर पाटील हेच करत होते, असेही प्रविण म्हात्रे यांनी जबाबात म्हटले आहे.
या जबाबादरम्यान ईडीने प्रविण म्हात्रे यांना विचारले की, बनावट आणि चुकीची कागदपत्रे वापरून तयार केलेल्या ६३ बोगस कर्ज खात्यांच्या प्रॉमिसरी नोटवर बॅकडेटेड (मागील तारखेनुसार) सह्या का केल्या ? या ईडीच्या प्रश्नावर उत्तर देताना प्रभारी सीईओ प्रविण रामभाऊ म्हात्रे म्हणाले की, ६३ (बोगस) कर्जखाती ही कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांच्याशी संबंधित असून त्या खात्यांचा ते वैयक्तिक लाभासाठी वापर करीत असल्याचे सीईओ हेमंत मुरलीधर सुताने यांनी मला सांगितले. मी बँकेचा कर्मचारी असल्याने बँकेचे अध्यक्ष, सीईओ आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे मला बंधनकारक आहे. त्यामुळेच मी प्रॉमिसरी नोटवर मागील तारखेच्या सह्या केल्या.
प्रवीण म्हात्रेचा कर्नाळा प्रवास, १२ वर्षांत क्लर्क ते सीईओ
प्रवीण रामभाऊ म्हात्रे यांनी फेब्रुवारी २००९ ला कर्नाळा बँकेत क्लर्क या पदावर काम सुरू केले. दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांना ज्युनिअर ऑफिसर या पदावर पदोन्नती देऊन नवीन पनवेल येथील कर्नाळा बँकेच्या शाखेत नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांना २०१४ साली पनवेल ब्रांचचे मॅनेजर म्हणून प्रमोशन देण्यात आले. त्यानंतर जुलै २०१७मध्ये म्हात्रे याची कर्ज विभागात कर्ज व्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली. त्यानंतर अपर्णा वडके यांनी राजीनामा दिल्यामुळे एप्रिल २०२०मध्ये बँकेवर नेमलेल्या प्रशासकाने म्हात्रे यांना प्रभारी सीईओ या पदावर नियुक्ती केली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार डीआयसीजीसीमार्फत ठेवीदारांना ठेवींपैकी पाच लाखांपर्यंतच्या विम्याची रक्कम परत मिळणार आहे. ही रक्कम सर्व पात्र ठेवीदारांना परत मिळवून देण्याची जबाबदारीही कायद्यानुसार कर्नाळाचे प्रभारी सीईओ प्रवीण रामभाऊ म्हात्रे यांच्यावरच आहे.